१४९ मतांची तफावत
By Admin | Updated: October 20, 2014 23:03 IST2014-10-20T23:03:20+5:302014-10-20T23:03:20+5:30
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी झालेले मतदान व १९ आॅक्टोबरला झालेल्या मतमोजणीबाबत निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदान संख्येत १४९ मतांची तफावत दिसून येत आहे.

१४९ मतांची तफावत
आकडेवारीत घोळ : मतदान, मतमोजणीच्या नोंदींमध्ये चुका
गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी झालेले मतदान व १९ आॅक्टोबरला झालेल्या मतमोजणीबाबत निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदान संख्येत १४९ मतांची तफावत दिसून येत आहे. अचलपूर, दर्यापूर वगळता इतर सहा मतदारसंघांत दोन्ही दिवसांच्या मतदान संख्येमध्ये घोळ झाल्याचे दिसते. अमरावती, बडनेरा, मोर्शी, मेळघाट, तिवसा व धामणगाव मतदारसंघातील मतदान संख्येत तफावत दिसून येत आहे.
याबाबत निवडणूक विभागाशी संपर्क साधला असता मतदानाची टक्केवारी देताना मतदान केंद्राध्यक्ष, झोनल अधिकारी तसेच तहसील कर्मचाऱ्यांकडून ही चूक झाल्याचे सांगण्यात आले. मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी झोनल अधिकारी मतदान केंद्राध्यक्षांकडून मोबाईलवरून मतदानाची टक्केवारी घेतात व मतदारसंघातील मुख्य निवडणूक कार्यालयास देतात व या आधारे मतदानाच्या दिवशी किती मतदारांनी मतदान केले, हे पाहून मतदानाची टक्केवारी निवडणूक विभागाद्वारे जाहीर केली जाते.
टपाल मते वगळून मतदानाची आकडेवारी व दोन्ही दिवसांची मतदारसंख्या सारखी असायला हवी.