१३२ केव्ही टॉवरलाईन पूर्णत्वाकडे
By Admin | Updated: February 10, 2017 00:09 IST2017-02-10T00:09:47+5:302017-02-10T00:09:47+5:30
मागील जानेवारी महिन्याच्या शेवटी उद्घाटनाच्या घोषणा केल्यानंतरही १३२ केव्ही टॉवर वीज लाईन न आल्याने नागरिक हैराण होते.

१३२ केव्ही टॉवरलाईन पूर्णत्वाकडे
प्रतीक्षा संपणार : विजेचा प्रश्न लागणार मार्गी, नागरिकांना दिलासा
धारणी : मागील जानेवारी महिन्याच्या शेवटी उद्घाटनाच्या घोषणा केल्यानंतरही १३२ केव्ही टॉवर वीज लाईन न आल्याने नागरिक हैराण होते. मात्र, आता ही टॉवर लाईन अंतिम चरणात पोहोचली असून ट्रांसफॉर्मर रिचार्ज करून टेस्टींगसाठी सज्ज झाल्याची माहिती आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी कोणत्याही परिस्थितीत हीसेवा मेळघाटातील जनतेपर्यंत पोहोचणार असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री व त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानी दिली आहे. मेळघाटात धारणी व चिखलदरा तालुक्यातील १७० गावे केवळ एकमात्र १९६० पासूनच्या ३३ केव्ही वीजपुरवठ्यावर अवलंबून होत्या. त्यामुळे अत्यंत कमी वीजदाब व १८ तासांच्या भारनियमनामुळे स्थानिक जनता वैतागून गेली होती. यासमस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी यासाठी काँग्रेसचे तत्कालीन आमदार केवलराम काळे यांनी प्रयत्न केलेत. त्यांच्या कार्यकाळातच नेपानगर-जावरा-जुटपानी या महाराष्ट्र व मध्यप्रदेश आंतराज्यीय कराराद्वारे टॉवर लाईनचा सर्वे पूर्ण करण्यात आला होता. त्यानंतर आघाडी सरकार पायउतार होऊन युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापित झाले. मेळघाटातही सत्तापरिवर्तन होऊन भाजपचे प्रभुदास भिलावेकर आमदार झाले. त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे १३२ केव्ही वीज लाईनचा पाठपुरावा करीत अनेकवेळा मध्यप्रदेशातील वीज कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन १३२ केव्ही लाईन लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी त्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून १३२ केव्ही लाईन आता पूर्णत्वास आली आहे.
वीजजोडणी व १३२ केव्ही उपकेंद्राचे काम संपले असून एक-दोन दिवसात ट्रांसफॉर्मर रिचार्ज करण्यात येणार आहे. तर पुढील १५ दिवसांत ही सेवा मेळघाटातील ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची वार्ता कळताच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता येथील विजेची समस्या कायमस्वरूपी सुटणार असल्याने नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)