पावसाळ्यापासून १३० आत्महत्या, शासनाच्या लेखी तरीही आलबेल !

By Admin | Updated: October 17, 2015 00:17 IST2015-10-17T00:17:06+5:302015-10-17T00:17:06+5:30

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून स्वत:भोवती मृत्यूचा फास आवळला.

130 suicides from the monsoon, even written in the government! | पावसाळ्यापासून १३० आत्महत्या, शासनाच्या लेखी तरीही आलबेल !

पावसाळ्यापासून १३० आत्महत्या, शासनाच्या लेखी तरीही आलबेल !

अमरावती : यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून स्वत:भोवती मृत्यूचा फास आवळला. खरिपाचे मुख्य पीक सोयाबीनमध्ये रोटाव्हेटर फिरविण्याचे सत्र जिल्हाभरात सुरू आहे. शुक्रवारी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत जिल्ह्यातील १,९८१ गावांपैकी एकाही गावाचा समावेश नाही. जिल्ह्यात आलबेल स्थिती दर्शविली हे धक्कादायक आहे.
यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ५० टक्के म्हणजेच ३ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. पेरणी पश्चात पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी मारली. सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नसल्याने शेंगा पोचट राहिल्या. त्यातच पिवळ्या मोझॅकच्या अटॅकमुळे दाणा भरलाच नाही, एकरी पोतभर झडती येण्याची आशा नाही, उत्पादन खर्च दूर, मळणीचा खर्च निघण्याची शक्यता नसल्याने शेतकरी सोयाबीनच्या उभ्या पिकात नांगर फिरवीत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.
परतीचा पुरेसा पाऊस नाही, त्यामुळे जमिनीत आर्द्रता नाही. यामुळे कापूस, तुरीची वाढ खोळंबली आहे. कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीवर किडी व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन खर्च निघणार की नाही या घोर चिंतेत शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत असताना त्याच्या पदरी निराशा आली आहे. जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्र असणाऱ्या जिरायती क्षेत्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बागायती क्षेत्रातील अवस्थादेखील बिकट आहे. जिल्ह्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा आहे. आंबिया बहाराची फळगळ होत आहे. संत्र्याचे मार्केट पुरते कोलमडले आहे. भाव कमी असल्याने व्यापारी फिरकेनाशे झाले आहेत. पुढचा बहर घेण्यासाठी संत्रा तोड एव्हाना व्हायला हवी होती. मात्र, खरेदीदारांअभावी संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. खरीपही गेला, रबीची तीच अवस्था, अन् शासन म्हणते जिल्हा आलबेल ही शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 130 suicides from the monsoon, even written in the government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.