१३ कोटींचे स्वच्छता कंत्राट ३० कोटींत कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:37 IST2017-11-14T23:37:06+5:302017-11-14T23:37:18+5:30
शहरातील दैनंदिन स्वच्छतेवर १३ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना एकल कंत्राटाची किंमत ३० कोटी कशी, असा सवाल करत आ. रवि राणा यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

१३ कोटींचे स्वच्छता कंत्राट ३० कोटींत कसे?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील दैनंदिन स्वच्छतेवर १३ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना एकल कंत्राटाची किंमत ३० कोटी कशी, असा सवाल करत आ. रवि राणा यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. महापालिका आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या सभागृहात मॅरेथॉन बैठक घेऊन आ.राणा यांनी विविध प्रलंबित विषयांना हात घातला.
बहुतांश उत्तरे सकारात्मक न आल्याने राणा यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी विविध अधिकाºयांचा क्लास घेऊन प्रशासकीय लेटलतिफी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी महापालिकेच्या विधी सभापती सुमती ढोके, नगरसेविका सपना ठाकूर, आशिष गावंडे यांच्यासह युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या कालावधीनंतर राणा यांनी महापालिकेत बैठक घेतल्याने तब्बल १८ विषयांवर घणाघाती चर्चा झाली. महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असताना स्वच्छतेवर ३० कोटी रुपये खर्च करणे प्रशासनाला परवडेल काय? अन्य दायित्वाचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. ते खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, मोकाट श्वानांचा प्रादुर्भाव रोखावा, डेंग्यू मलेरियाचा प्रकोप तातडीने रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही सूचना त्यांनी केली. महापालिकेच्या विविध रुग्णालयात औषधींचा अल्प साठा, रमाई घरकूल योजना, पंतप्रधान आवास योजना, राजापेठ ओव्हरब्रिज, भीमटेकडी सौंदर्यीकरण, रिलायंस कंपनीकडून झालेले खोदकाम, आॅटो डीसीआर प्रणाली, भुयारी गटार योजना, शहरातील अनधिकृत फलकबाजी, नेताजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, ग्रीन स्पेस, अकोली बायपास, छत्री तलावाचे सौंदर्यीकरण आदी मुद्द्यांवर आ. राणा यांनी महापालिका आयुक्तांकडून माहिती घेतली. तसेच रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची सूचना केली. बैठकीला महापालिका अधिकाºयांसह एसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ व अन्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
राणांच्या निवेदनात 'बीव्हीजी'चे नाव
स्वच्छतेच्या एकल कंत्राटासाठी १३ नोव्हेंबरला निविदा प्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया ११ डिसेंबरला संपुष्टात येऊन त्यानंतर पात्र निविदाधारक कंपनीचे नाव उघड होईल. मात्र आ.राणा यांनी मंगळवारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात 'बीव्हीजी' या कंपनीचे नाव उघडपणे घेण्यात आले आहे. स्थायी समिती सभापती तुषार भारतीय याच कंपनीला समोर ठेवून एकल कंत्राट करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
सत्ताधीशांवर कोरडे
अमरावती महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरी प्रलंबित विषयांची संख्या अधिक आहे. महापालिकेत श्रेयाची लढाई सुरू असून तुषार भारतीय यांनी दावा केलेले १३६ कोटी रुपये कोठे आहेत, अशी विचारणा आ.राणा यांनी केली. तीन तास चाललेल्या मॅराथॉन बैठकीत त्यांनी प्रशासनासह भाजपवरही कोरडे ओढले.