लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी १२,६४४ अर्ज दाखल झाले. आयोगाने अडीच तासांची वेळ वाढविली असली तरी पाच तालुक्यांत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने रात्री उशिरापर्यंत अर्जाची प्रक्रिया सुरू होती.जिल्ह्यात मार्च महिन्यात ५२४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा लवलेशही नव्हता. त्यावेळी उमेदवारी दाखल करण्याचे अखेरचे दिवशी म्हणजेच १६ मार्चला १३,३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते व दोन दिवसात आयोगाने आहे त्या स्थितीत पुढील आदेशापर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली होती व नोव्हेंबर महिन्यात यापूर्वीची प्रक्रियाच रद्द करुन व जून ते डिसेंबर महिण्यात मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायतींची संख्यावाढ करून ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ११ डिसेंबरला जाहीर केला. त्यानुसार २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये एकाच वेळी गर्दी झाल्याने सर्व्हरची गती मंदावली यासह अनेक तांत्रिक त्रुटी आल्याने आयोगाद्वारा शेवटच्या दिवशी ऑफलाईन म्हणजेच पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले व उमेदवारी अर्ज दाखल करण्याला ३ ऐवजी सायंकाळपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली होती.यामध्ये धारणी, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, वरुड व दर्यापूर तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाद्वारा दाखल उमेदवारी अर्जांची संख्या गुरुवारी जाहीर करण्यात आली.
१५ जानेवारीला मतदान १५ जानेवारीला १९५१ मतदारकेंद्रांमध्ये ११,०७,२११ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये अमरावती तालुक्यात ९५,७२१, भातकुली ६७,९५२, नांदगाव ८२,२३५, मोर्शी ८२,४५२, वरुड ८७,५०९, दर्यापूर् ९२,७४०, अंजनागाव ६९,६८३, अचलपूर ९२,१९३, चांदूर रेल्वे ४५,५१९, धामणगाव रेल्वे ८७,६०१, चांदूरबाजार १,०१,८३२, धारणी ६१,५५३, तिवसा ६६,५५३ व चिखलदरा तालुक्यात २९,८६४ मतदार आहेत.