पंकज लायदे
धारणी : तालुक्यात कोविड केअर सेंटरवर कंत्राटी म्हणून लागण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने आदिवासींकडून प्रत्येकी १२ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला. यासंदर्भात ‘लोकमत’कडे भक्कम पुरावे आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका प्रशासनाने शहरातील मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर उघडले. तेथे कंत्राटी तत्वांवर कर्मचारी लावण्याचे आदेश धारणी तालुका आरोग्य अधिकाºयांना देण्यात आले. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील एकाने गावातीलच आदिवासी युवकांना अकरा महिन्यांकरिता नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. त्याकरिता प्रत्येकी १२ हजार रुपये द्यावे लागेल, असे सांगून आठ जणांकडून प्रत्येकी १२ हजार रुपये घेतले. त्यांना फक्त तीन महिने तेथे काम दिले. त्याचेही कोणते नियुक्ती पत्र दिले नाही. १२ हजार रुपये प्रतिमाह मानधन देण्याची बतावणीदेखील केली. मात्र, तीन महिन्यानंतर त्या आठही कर्मचाऱ्यांना कोणतेही कारण न सांगता कामावरून कमी करण्यात आले.
त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी पगाराची मागणी केल्यानंतर त्यांना १२ हजार रुपये पगार न देता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त ९ हजार जमा करण्यात आले. उर्वरित तीन हजारांबाबत विचारणा केली असता ९ हजारच ठरले होते, असे त्या गायगोले नामक कर्मचाऱ्याने सांगितले. गायगोले याने त्यातील अजय डहाके या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्याला पुन्हा ४ हजार रुपये मागितले. त्यावर अजय व त्याच्या आई वडिलांनी त्याला कशाचे पैसे, असे विचारल्याने तो तेथून परतला. त्याबाबत आठही कर्मचाऱ्यांनी तालुका वैदयकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र दखल घेण्यात आली नाही.
यांची झाली आर्थिक फसवणूक
तक्रारीनुसार, श्याम कासदेकर, हिरालाल जावरकर, अजय डहाके, संजू नंदू जावरकर, कुणाल गोफने, कैलास उईके, सुधीर सेलेकर या आदिवासी युवकांकडून प्रत्येकी बारा हजार रुपये घेण्यात आले. ती रक्कम काहींनी व्याजाने घेऊन तर काहींनी पत्नीचे दागिणे मोडून गायगोले नामक आरोग्य कर्मचाºयाला दिले.
कोट १
११ महिन्यांचे काम आहे, असे सांगून मला फक्त तीन महिने कोविड केअर सेंटरला काम देण्यात आले त्यांनतर न सांगता कामावरून कमी करण्यात आले. त्या कामावर लावण्याकरिता माझ्याकडून गायगोले नामक कर्मचाºयाने १२ हजार रुपये घेतले.
अजय डहाके
तक्रारकर्ता, धारणी
कोट २
जिल्हा परिषदेकडून आलेल्या निवड यादीनुसार, आम्ही कंत्राटी कर्मचाºयांची निवड केली. जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. आमच्याकडील एका कर्मचाºयाने पैसे घेतल्याची तोंडी तक्रार प्राप्त झाली. त्याबाबत त्यांना लेखी तक्रार देण्यास सुचविले.
शशिकांत पवार
तालुका आरोग्य अधिकारी, धारणी
कोट ३
नोकरीचे आमिष देऊन आदिवासी युवकांकडून रक्कम घेण्यात आली असेल, तर त्याबाबत तक्रार व सबळ पुरावे मिळाल्यास कारवाई करण्यात येईल.
बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद
--------