गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर असतांना हरभऱ्याची शासकीय खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाफेडचे पोर्टल मुदतपूर्व बंद करण्यात आल्याने ऑनलाइन नोंदणी केलेल्या ७,५५३ शेतकऱ्यांच्या २,१८,१७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी बाकी आहे. याचा फायदा घेत खासगी बाजरामध्ये व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यानेे किमान ११४ कोटींचा हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.खासगीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने विक्री होत असल्याने २६,३२१ शेतकऱ्यांनी नाफेड करिता ऑनलाइन नोंदणी केली. त्याच्या तुलनेत १८,७६८ शेतकऱ्यांचा हरभरा २३ मेपर्यंत खरेदी करण्यात आला. अद्याप ७,५५३ शेतकऱ्यांच्या २,१८,१७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी व्हायची असताना मुदतपूर्व पोर्टल बंद करण्यात आले. त्यामुळे ५,२३० या हमी भावाप्रमाणे किमान ११४ कोटींचा हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचे संरक्षण मिळावे, याकरिता शासन खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये व्हीसीएमएफच्या अमरावती, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड व येवदा या केंद्रांवर १३,८८९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्याच्या तुलनेत ९,२७० शेतकऱ्यांच्या २.३० लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील अद्याप ४,६१९ शेतकऱ्यांची १.२६ लाख क्विंटल हरभरा खरेदी बाकी आहे.
डीएमओ केंद्रांवर ९२ हजार क्विंटल खरेदी बाकीडीएमओच्या अचलपूर,जयसिंग अचलपूर, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धारणी, खल्लार, नांदगाव खंडेश्वर, नेरपिंगळाई व तिवसा केंद्रांवर १२,४३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत १२,९११ शेतकऱ्यांचा २.२४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अद्याप २,९३४ शेतकऱ्यांचा ९२ हजार क्विंटल हरभरा खरेदी प्रतीक्षेत आहे.
जिल्हा उपनिबंधकांचे सरव्यवस्थापकांना पत्रबाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी भावाने मागणी होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने विचारणा होत असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी उर्वरित शेतकऱ्यांची खरेदी करण्याची मागणी मार्केटिंग फेडरेशनच्या सरव्यवस्थापकडे गुरुवारी केली.