लाक डाचे ११ नमुने तपासणीसाठी डेहरादूनला पाठविणार
By Admin | Updated: March 19, 2016 00:14 IST2016-03-19T00:14:29+5:302016-03-19T00:14:29+5:30
वलगाव मार्गालगतच्या नेहा वूड इंडस्ट्रिज येथे गत दोन दिवसांपासून वनविभागाने लाकूड साठा तपासण्याची मोहीम राबविली.

लाक डाचे ११ नमुने तपासणीसाठी डेहरादूनला पाठविणार
उपवनसंरक्षकांची कारवाई : नेहा वूड संचालकाविरुद्ध प्राथमिक वनगुन्हे दाखल
अमरावती : वलगाव मार्गालगतच्या नेहा वूड इंडस्ट्रिज येथे गत दोन दिवसांपासून वनविभागाने लाकूड साठा तपासण्याची मोहीम राबविली. यात आंबा लाकूड आढळून आले. मात्र हे लाकूड किती दिवस पूर्वी कापले, त्याचे आर्युमान किती? हे तपासण्यासाठी लाकडाचे ११ नमुने ताब्यात घेऊन ते डेहरादून येथील प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले जाणार आहे. तत्पूर्वी वनविभागाने नेहा वूड संचालकाविरुद्ध प्राथमिक वनगुन्हे दाखल केले आहे.
नेहा वूड येथे नियमबाह्य लाकूड असल्याची तक्रारी उपवनसंरक्षकाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार या अर्जांची गोपनीयरित्या पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापडा रचून नेहा वूड इंडस्ट्रिजवर धाडसत्र राबविण्यात आले. आंबा प्रजातीच्या लाकडासह इतरही प्रजातीचे लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आले. लाकूड तपासताना त्याची वाहतूक परवानगी (टीपी) पास तपासण्यात आली. मात्र नेहा वूड संचालकांकडे असलेल्या टीपी पासनुसार जास्त लाकूड साठा असल्याचा अंदाज वनविभागाला आहे. वनविभागाने जारी केलेल्या टीपी पास यांचा मेळ जुळत नसल्यामुळे लाकडाची प्रयोगशाळेत तपासणी करण्याचा निर्णय उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांनी घेतला. त्यानुसार वडाळीचे वनपरिक्षेत्रधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी लाकडाचे ११ नमुने ताब्यात घेण्यतापूर्वी नेहा वूड संचालकाविरुद्ध प्राथमिक वनगुन्हा दाखल केला आहे. १.०५६ टन लाकूड जादा असल्याबाबत वनविभागाला संशय आहे. आंबा लाकूड नेमके आणले कोठून हे शोधण्याचे काम वनविभाग करीत आहे. नेहा वूडमध्ये असलेले आंबा लाकूड २२ लाख रुपये किमतीचे असल्याचा अंदाज वनविभागाचा आहे. लाकूड आणल्याबाबत टीपी पास असल्या तरी त्या पासेसमध्ये गौडबंगाल असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लाकडाचे आर्युमान तपासण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात येईल.
आरागिरणी सील होण्याचे संकेत
नेहा वूड इंडस्ट्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड साठा असल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या टप्प्यात वनगुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल पाठविला जाईल. उपवनसंरक्षकांच्या आदेशानुसार आरागिरणी सीलची कारवाई होईल, असे आरएफओ पडगव्हाणकर यांनी सांगितले. यात वननियमानुसार चौकशी करण्यात आली आहे.
साईकृपा, वाह ताजची तपासणी
वनविभागाच्या चमूने गुरुवारी नेहा वूडसह स्थानिक नेहरु टिंबर मार्केटमधील साईकृपा आरागिरणी व ताजनगर परिसरातील वाह ताज आरागिरणीची तपासणी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. तसेच अन्य दोन आरागिरण्यांची तपासणीदेखील करण्यात आली असून या आरागिणी तपासणी अहवालाकडे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
डेहरादूनच्या अहवालावर बरेच काही अवलंबून
नेहा वूडमधून ११ लाकडाचे नमुने डेहरादून येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. लाकडाच्या तपासणी अहवालावर बरेच काही अवलंबून आहे. टीपी पासची तारीख आणि लाकडाचे आर्युमान यात फरक असला तर न्यायालयात ही बाब ठोसपणे मांडता येईल, असे वनविभागाचे म्हणणे आहे.
नेहा वूडची तपासणी पूर्ण झाली आहे. आरएफओकडून अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आरागिरणीत नियमबाह्य लाकूड असेल तर नक्कीच सीलची कारवाई होईल. यात कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही.
- राजेंद्र बोंडे , सहायक वनसंरक्षक, अमरावती.