‘क्लस्टर हॉटस्पॉट’मधील ११ व्यक्तींना 'डिस्चार्ज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:19+5:30
यामध्ये हबीबनगर येथील दोन पुरूष, हनुमाननगर येथील दोन पुरूष, शिराळा येथील चार पुरुष, बडनेरा येथील एक पुरुष व वरूड येथील दोन महिलांचा समावेश आहे. मंगळवारी येथील जिल्हा कोविड रुग्णालयातून २४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. त्यामुळे जिल्ह्यात ५६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने १६ व्यक्तींवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.

‘क्लस्टर हॉटस्पॉट’मधील ११ व्यक्तींना 'डिस्चार्ज'
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटमधील ११ संक्रमित व्यक्तींना १० दिवसांच्या उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना बुधवारी दुपारी कोरोनामुक्त करण्यात आले. आरोग्य विभागाने जारी केलेल्या नव्या गाईड लाइननुसार या रुग्णांमध्ये १० दिवसांत लक्षणे नसल्याने त्यांना 'डिस्चार्ज' केल्या जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक ६७ टक्के आहे.
यामध्ये हबीबनगर येथील दोन पुरूष, हनुमाननगर येथील दोन पुरूष, शिराळा येथील चार पुरुष, बडनेरा येथील एक पुरुष व वरूड येथील दोन महिलांचा समावेश आहे. मंगळवारी येथील जिल्हा कोविड रुग्णालयातून २४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. त्यामुळे जिल्ह्यात ५६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने १६ व्यक्तींवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करीत त्यांना निरोप दिला.
ज्या संक्रमित रुग्णाला १० दिवस झाले व त्यांचे ‘एसपीओ-२’ चांगले आहे व रुग्णांची लक्षणे सुरू झाल्यानंतर ७, ८ व ९ व्या दिवशी ताप नसेल तर अशा सौम्य स्वरुपाच्या रुग्णांना कोरोनामुक्त करण्याच्या नव्या गाइडलाइन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ९ मे रोजी दिल्या. त्यानुसार मंगळवारी २४ कोरोना विषाणूच्या संक्रमितांना 'डिस्चार्ज' दिल्यानंतर बुधवारी ११ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार आहेत. यासाठीचे हमीपत्र त्यांचेकडून लिहून घेतले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळवारी महापालिकेत शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात आली.
पाच दिवस कोर्स, पाच दिवस निरीक्षण
संक्रमित व्यक्तीला कोविड रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची दोन वेळा तपासणी केली जाते. पहिले पाच दिवस कोविड-१९ चा कोर्स दिला जातो व नंतरच्या पाच दिवसांत त्यांना निरीक्षणात ठेवले जातात. या काळात त्यांच्यामध्ये काही लक्षणे न दिसल्यास त्यांना 'डिस्चार्ज' दिला जातो. यापूर्वी हा कालावधी १४ दिवसांचा होता. यामध्ये १५ व १६ व्या दिवशी त्यांच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यासच ‘त्या’ व्यक्तीला कोरोनामुक्त करून घरी पाठविले जात होते. आता नव्या नियमामुळे अधिकाधिक रुग्णांना याचा दिलासा मिळाला आहे. मात्र, रुग्ण जर आयसीयूमध्ये असेल. मात्र, त्याला 'डिस्चार्ज' दिला जात नसल्याचे डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या नव्या गाइडलाइननुसार ज्या व्यक्तींना १० दिवसांत लक्षणे नाहीत, अशाच व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. यामध्ये पाच दिवसांचा औषधांचा कोर्स व पाच दिवस या व्यक्तींना आॅर्ब्झव्हेशनमध्ये ठेवले जातात व त्यानंतर लक्षणे नसल्यास अशा रुग्णांना 'डिस्चार्ज' दिला जातो.
- डॉ श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक