‘फिट इंडिया’त जिल्ह्यातील १०९९ शाळा ‘अनफिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:08+5:302020-12-30T04:17:08+5:30
(असाईमेंट) अमरावती : कोरोनाकाळात सर्वांच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोराेनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ...

‘फिट इंडिया’त जिल्ह्यातील १०९९ शाळा ‘अनफिट’
(असाईमेंट)
अमरावती : कोरोनाकाळात सर्वांच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोराेनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातून या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद मात्र अत्यंत निराशाजनक आहे. सुमारे २८९३ शाळांपैकी १७९४ शाळांनीच सहभाग नोंदविला. खेळांकडे पाहण्याचा समाजाचा आणि शाळांचा दृष्टिकोन अत्यंत उदासीन असल्याचे यावरून स्पष्ट होते.
जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या २,८९३ शाळा आहेत. सर्वच शाळांनी ‘फिट इंडिया’मध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र तशी नाही. फेब्रुवारीत मोहीम सुरू झाल्यानंतर क्रीडा व शिक्षण विभागाने तालुकानिहाय बैठका घेतल्या. या योजनेची माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले. अमरावती, तिवसा, अचलपूर, धामणगाव रेल्वे तालुक्यांनी यात रस दाखविला. उर्वरित तालुक्यांतील शाळांनी मात्र नोंदणीकडे पाठ फिरविली. नोंदणीची मुदत २७ डिसेंबरपर्यंतच होती. त्यामुळे नोंदणी करणाऱ्या शाळांनाच याचा लाभ मिळणार आहे. मात्र, या मोहिमेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याचे संकेत क्रीडा क्षेत्रातून मिळत आहेत. संपूर्ण नोंदणी ऑनलाईन स्वरूपात करायची आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला लिंक देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात नोंदणी सुरू झाली. नेमक्या याच काळात शाळा बंद होत्या. विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांचा संपर्कच राहिला नाही. त्याचाही फटका ‘फिट इंडिया’ला बसला. मुळात या उपक्रमाची सुरुवातच चुकीच्या वेळी झाल्याची प्रतिक्रिया क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केली.
-----------------------
पहिली ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालये : २८९३
शाळांची नोंदणी: १७९४
शिक्षक: ५४७
---------------------
शारीरिक शिक्षणासाठी शिक्षकच प्रभारी
शाळांमध्ये खेळांविषयी अत्यंत अनास्था असल्याचे ‘फिट इंडिया’ मोहिमेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. क्रीडा साहित्य वर्षानुवर्षे धूळखात पडले आहे. ते मुलांच्या पुढ्यात येतच नाही. सहायक शिक्षकच क्रीडा शिक्षक असतो. त्याच्याकडे खेळ सोडून शाळेतील अन्य सर्व कामे लावली जातात. मूळ विषय बाजूलाच राहतो.
---------------------------
कोरोनामुळे शाळा बंद राहिल्या. त्याचा फटका ‘फिट इंडिया’ मोहिमेला बसला. शाळा व मुलांशी संपर्कच झाला नाही. योजनेचा प्रसारही परिणामकारक होऊ शकला नाही. आता शाळा सुरू होत असल्याने नोंदणी वाढण्याची अपेक्षा आहे. तंदुरुस्त देशासाठी मोहीम महत्त्वाची आहे.
- वामन बोलके, शिक्षणाधिकारी, अमरावती.
---------------------------
लॉकडाऊन काळात ‘फिट इंडिया’साठी पूर्ण नोंदणी शक्य झाली नाही. चार तालुक्यांतून क्रीडा शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन नोंदणीसाठी आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. अजूनही नोंदणी सुरू आहे. जास्तीत जास्त शाळांच्या सहभागाचे आमचे प्रयत्न
आहेत. - गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी