**********************
** १०८ रुग्णवाहिकेचे कंट्रोलर करतात प्रायव्हेट, सरकारी असा भेदभाव
*******†**†***********
दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना तालुक्यात शासकीय कोविड हाॕॅस्पिटल नसताना गंभीर परिस्थिती झालेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयातून नेण्यासाठी नकार देणाऱ्या १०८ ॲम्बुलन्सचा काय उपयोग? रुग्णावाहिका शासकीय रुग्ण, खासगी रुग्ण असा भेद करू शकते काय, असा प्रश्न नुकताच एका कोविड रुग्णाबाबत निर्माण झाला होता. शेवटी त्या रुग्णास खासगी वाहनाने परतवाडा येथे हलविण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की १० दिवसांपूर्वी दयानंदनगर येथील गरीब कुटुंबातील हातमजुरी करणारे शिवदास पायघन हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्यांना भंडारज येथील खासगी कोविड हाॕॅस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना आठ दिवसानंतर सुटी मिळाली. परंतु घरी येताच दुसऱ्याच दिवशीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांना शहरातीलच एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना परतवाडा किंवा अमरावती कोविड सेंटरमध्ये नेण्याचे सुचवले असता सामाजिक कार्यकर्ते मनोहर मुरकुटे यांनी शहरातील काही खासगी रुग्णवाहिकेसाठी फोन लावून प्रयत्न केले; परंतु उपलब्ध झाली नाही. शेवटी शासनाचे १०८ या नंबरवर संपर्क केला असता रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून आम्ही पेशंटला फक्त सरकारी कोविड सेंटरवरूनच नेतो, प्रायव्हेट सेंटरवरून नेत नाही, असे उत्तर मिळाले. रुग्णाची वाईट स्थिती पाहता अखेर रुग्णाला खासगी गाडीने परतवाडा येथे न्यावे लागले.
यावरून शासनाची रुग्णवाहिका ही लोकांचे जीव वाचविण्याचे काम करत आहे की रुग्णाला मारण्याचे काम करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशी परिस्थिती पुन्हा घडू नये व रुग्ण हा प्रायव्हेट दवाखान्यात असो की सरकारी दवाखान्यात असो, त्या रुग्णाला १०८ या रुग्णवाहिकेने सेवा उपलब्ध करून द्यावी. या विषयीचे निवेदन तहसीलदार जगताप यांच्यामार्फत जिल्हाधिका-यांना सामाजिक कार्यकर्ते मनोहर मुरकुटे, सचिन जायदे यांनी दिले. जिल्हाधिकारी या गंभीर बाबीवर काय निर्णय घेतात, याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.