सालबर्डीसाठी मंगळवारपासून १०५ लालपरी; एसटी महामंडळाचे नियोजन, यात्रा स्पेशल बसेसची सुविधा
By जितेंद्र दखने | Updated: March 2, 2024 19:01 IST2024-03-02T19:01:40+5:302024-03-02T19:01:46+5:30
महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र सालबर्डी तसेच श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने तयारी केली आहे.

सालबर्डीसाठी मंगळवारपासून १०५ लालपरी; एसटी महामंडळाचे नियोजन, यात्रा स्पेशल बसेसची सुविधा
अमरावती: महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र सालबर्डी तसेच श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने तयारी केली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ८ आगारांतून १०५ यात्रा स्पेशल एसटी बसेसच्या विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सालबर्डी येथे श्री शंभू महादेव यात्रेसाठी ५ ते १३ मार्चपर्यंत एसटी बसेस धावणार आहेत. या यात्रेत जिल्ह्यासह विदर्भ व मध्यप्रदेशातून हजारो भाविक दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त येतात. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भाविकांची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. अमरावती विभागाद्वारे यात्रा कालावधीत अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, परतवाडा, चांदूर बाजार, दर्यापूर, वरूड, मोर्शी, तिवसा येथून जादा बस फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे महिला सन्मान योजनेत ५० टक्के आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आणि ७५ वर्षावरील नागरिकांना शंभर टक्के सवलती सवलतीत प्रवास करण्याची सुविधाही एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्याची माहिती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली.