१०,४४३ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट
By Admin | Updated: July 22, 2016 00:09 IST2016-07-22T00:09:39+5:302016-07-22T00:09:39+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे बुधवारी २० जुलै रोजी सहाव्या दिवशीही कामकाज ठप्पच होते.

१०,४४३ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट
लेखणीबंदचा परिणाम : जिल्हा नियोजनचा आराखडाही लटकला
अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे बुधवारी २० जुलै रोजी सहाव्या दिवशीही कामकाज ठप्पच होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकूण १० हजार ४४३ कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वेतनवाढीवर संकट ओढवले आहे. दुसरीकडे प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याने अधिकाऱ्यांची गोची झाली आहे.
जिल्हा परिषद लिपिकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने शुक्रवार १५ जुलैपासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. याचा बुधवारी ६ वा दिवस उजाळला आहे. अन्य जिल्हा परिषदांप्रमाणे अमरावती जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बांधकाम, लघू पाटबंधारे, पाणीपुरवठा, आयसीडीएसच्या सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहे. परिणामी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या सर्व कार्यालयातील कामकाज ठप्प आहे.
मागण्या मान्य होईस्तोवर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद, काम बंद आंदोलन कायम ठेवणार असल्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी घेतला आहे. शासनाने तत्काळ चर्चा करून लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. (प्रतिनिधी)