२० दिवसांत १०२ चोऱ्या
By Admin | Updated: December 22, 2015 00:20 IST2015-12-22T00:20:50+5:302015-12-22T00:20:50+5:30
चोरी, घरफोडी, चेनस्रॅचिंग, खंडणी, वाटमारी, फसवणूक असे गुन्ह्याच्या नानाविध प्रकाराचे शहरात सुरू असलेले सत्र पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपल्याचेच द्योतक आहे.

२० दिवसांत १०२ चोऱ्या
खाकीचा धाक गेला कुठे ? : ३३ लाखांच्या ऐवजावर डल्ला
अमरावती : चोरी, घरफोडी, चेनस्रॅचिंग, खंडणी, वाटमारी, फसवणूक असे गुन्ह्याच्या नानाविध प्रकाराचे शहरात सुरू असलेले सत्र पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपल्याचेच द्योतक आहे. चेनस्रॅचिंग आणि चोरीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेसाठी नागरिकांनी कुणाकडे धाव घ्यावी, कोणाचा आधार शोधावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या २० दिवसांत शहर आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारच्या २७६ घटनाांची नोंद झाली आहे. यात १०२ प्रकरणांत चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आलेत. १०० पेक्षा अधिक चोरीच्या घटनांसह एटीएम पासवर्ड, फसवणूक या माध्यमातून अमरावतीकरांच्या खिशावर चोरट्यांनी तब्बल ३१ लाख रूपयांचा डल्ला मारला. गेल्या २० दिवसांतील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
दुचाकी, मोबाईल एवढेच काय तर अमरावतीच्या घरातील दाळ, तांदुळही सुरक्षित नाहीत. दुचाकी आणि मोबाईल चोरीसोबत घरफोडीच्या घटनांमधून लाखोंचा ऐवज चोरीला जात असताना झालेल्या चोऱ्यांचा उलगडा झाल्याचे प्रमाण नगण्य आहे. या महिन्यात दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: कहर माजवला. एकाच दिवशी ३-३ दुचाकी लंपास करण्यात आल्याने दुचाकी पार्क करायची कुठे, असा प्रश्न दुचाकी चालकांना पडला आहे. यशोदानगर परिसरात एक दुचाकी पेटविण्यात आली. एकाकडून खंडणी वसूल करण्यात आली. एटीएम पासवर्ड विचारून खात्यातील रक्कम वळती करून ६ व्यक्तींची फसवणूक केली. शहरात ठिकठिकाणी रात्री पोलिसांची गस्तच नसल्याने व्यावसायिक प्रतिष्ठाने फोडून लाखोंच्या ऐवज लंपास करण्यात आला. या चोरीच्या सत्रामुळे व्यावसायिकांकडून ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याला देण्यात आलेली बगलसुद्धा चव्हाट्यावर आली आहे.
चेन स्रॅचिंगच्या तीन घटनांमधून लाखभर किमतीचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार आरोपींनी पळ काढला. अपघात, मारामाऱ्या वेगळ्याच. याशिवाय फसवणुकीचे ४ प्रकार उघड झाले. यात प्रामुख्याने लाईफलाईन ओरीएंटल ट्रेडलिंक्स या खासगी वित्तीय संस्थेकडून झालेल्या फसवणुकीचा समावेश आहे. तडीपारांकडून हत्या झाल्याने तडीपार आरोपींचा शहरातील मुक्त वावर, हा नवीन प्रश्न अमरावती पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. शहरात फिरणाऱ्या तडीपारांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)