ग्रीन रन मॅरेथॉनमध्ये १०२ स्पर्धकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:25+5:302021-02-05T05:33:25+5:30
आयपीएसदेखील धावले, नगर परिषद, वरूड पोलीस ठाण्याचा उपक्रम वरूड : स्थानिक नगर परिषद आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ...

ग्रीन रन मॅरेथॉनमध्ये १०२ स्पर्धकांचा सहभाग
आयपीएसदेखील धावले, नगर परिषद, वरूड पोलीस ठाण्याचा उपक्रम
वरूड : स्थानिक नगर परिषद आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ग्रीन रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तत्कालीन ठाणेदार व परीविक्षाधीन पोलीस अधिकारी श्रेणीक लोढांसह १०२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. गोकुल मनोहर पांडे, अश्विनी राजू माळोदे, शुभम राजेश तिवस्कर आणि तन्वी टेकाडे यांनी विविध गटांतून प्रथम क्रमांक पटकाविला .
स्पर्धेचे उदघाटन नगराध्यक्ष स्वाती आंडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून तत्कालीन ठाणेदार श्रेणिक लोढा, बांधकाम सभापती राजू सुपले, नगरसेवक धनंजय बोकडे, भाजप गटनेता नरेंद्र बेलसरे, आयोजक मुख्याधिकारी रवींद्र पाटील, ठाणेदार प्रदीप चौगावकर उपस्थित होते. महात्मा फुले चौकातून सकाळी ७ वाजता मॅरॅथॉन स्पर्धेला स्वाती आंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. श्रेणिक लोढांसह १०२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. १४ ते १८ वर्षे वयोगटाकरिता पाच किलोमीटरची स्पर्धा ठेवण्यात आली होती . यामध्ये ५२ स्पर्धक सहभागी झाले होते. पुरुष स्पर्धकांमधून गोकुल मनोहर पांडे याने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक जयेश दाढे आणि तृतीय क्रमांक विकास ढोके याने पटकावला. महिला स्पर्धकांमधून अश्विनी राजू माळोदे हिने प्रथम, ऋतुजा अतुल पाटील हिने द्वितीय, तर साक्षी प्रवीण माळोदे हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर १९ ते २५ वर्षे वयोगटाकरिता साडेसात किलोमीटरची स्पर्धा ठेवण्यात आली होती. यामध्ये ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. पुरुष गटातून शुभम राजेश तिवस्कर याने प्रथम, कार्तिक धोटे याने द्वितीय, तर दीपक दयाराम वंजारी याने तृतीय क्रमांक मिळविला. महिला स्पर्धकांमधून तन्वी टेकाडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी स्पर्धकांना सायकल, ट्रॉफी, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले . ग्रीन रन स्पर्धेकरिता नगर परिषद आणि पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.