ऊर्ध्व वर्धात १०० टक्के जलसाठा
By Admin | Updated: September 15, 2015 00:06 IST2015-09-15T00:06:42+5:302015-09-15T00:06:42+5:30
जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी दिली असली तरी मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढला.

ऊर्ध्व वर्धात १०० टक्के जलसाठा
अमरावती : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी दिली असली तरी मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढला. त्यामुळे सोमवारी उर्ध्व वर्धा धरणात १०० टक्के जलसाठ्याची नोंद झाली. प्रकल्प पूर्ण भरल्याने अमरावती शहरासह १०० गावांच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. तसेच मोर्शी, तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यामध्ये रबीच्या पिकांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ५६४.०५ दलघमी इतका असून पूर्ण संचयन पातळी ३४२.५० मीटर आहे. या तुलनेत १४ सप्टेंबर रोजी ३४२.५० मीटर जलसाठा आहे. हा जलसाठा ५६४.०५ दलघमी इता म्हणजेच १०० टक्के आहे.
जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी शहानूर प्रकल्पातील प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ४६.०४ दलघमी असून पूर्णसंचय पातळी ४४९.५० मीटर आहे. त्या तुलनेत ४४७.०३ मीटर आजचा जलसाठा आहे. हा उपयुक्त जलसाठा ३९.१९ दलघमी असून याची टक्केवारी ८५.१२ इतकी आहे. चंद्रभागा प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ४१.२५ दलघमी आहे व पूर्णसंचय पातळी ५०६.२० मीटर आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ५०३.४५. मीटर स्थिती जलाशयाची आहे. हा उपयुक्त जलसाठा ३२.९६ दलघमी इतका असून हा जलसाठा ७९.९० टक्के जलसाठा असल्याची नोंद आहे.
९६ तासांत जोरदार पावसाची शक्यता
कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ९६ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भात १५ सप्टेंबरपासून ९६ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३५ दिवसांच्या प्रदीर्घ खंडानंतरही पाऊस पडल्यास शेतीपिकांना संजीवनी मिळणार आहे.