जिल्ह्यातील १०० गावे तंटामुक्त
By Admin | Updated: March 22, 2015 01:24 IST2015-03-22T01:24:44+5:302015-03-22T01:24:44+5:30
तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १०० गावे तंटामुक्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केले.

जिल्ह्यातील १०० गावे तंटामुक्त
रोहितप्रसाद तिवारी मोर्शी
तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १०० गावे तंटामुक्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केले. धारणी तालुक्यातील सर्वाधिक २६ तर सर्वात कमी धामणगाव रेल्वे आणि भातकुली तालुक्यातील प्रत्येकी एका गावाला तंटामुक्तीचा मान मिळाला आहे.
तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून राज्यात तंटामुक्त गाव मोहीम राबविली जात आहे. गाव तंटामुक्त होण्याकरिता गावागावांत सर्वसमावेशक, राजकारण विरहीत तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली जाते. गावात तंटे होऊ नये, झालेच तर ते तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून आपसात सोडविले जावेत, शिवाय गावात सलोखा निर्माण व्हावा, महिलांचे, अपंगांचे, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यात यावे, अवैध धंद्यांवर अंकुश लावून या धंद्यात गुंतलेल्यांना तंटामुक्त गाव समितीच्या प्रयत्नातून पर्यायी रोजगार मिळावा, अतिक्रमण होऊ नये, अंधश्रध्दा निर्मूलन तथा वाईट प्रथा बंद व्हाव्यात इत्यादी उपक्रम तंटामुक्त गाव समितीच्या मार्फत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्हावेत, अशी ही संकल्पना आहे.
तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून वर्षभर राबविलेल्या उपक्रमांनंतर तंटामुक्त गावांनी स्वमूल्यांकन करुन गाव तंटामुक्त झाल्याचे जाहीर केल्यावर जिल्हा अंतर्गत मूल्यमापन समिती या गावांना भेटी देऊन त्यांच्या कार्यांचे मूल्यांकन करते, जिल्ह्यांतर्गत समितीने संबंधित गाव निवडल्यावर जिल्हाबाह्य मूल्यांकन समिती भेट देऊन मूल्यांकन करते आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामार्फत गावांची यादी गृहमंत्रालयास पाठविण्यात येऊन राज्य शासन अशा गावांची तंटामुक्त गाव म्हणून घोषणा करते. नुकतेच राज्य शासनाने सन २०१३-१४ च्या राज्यातील निवड झालेल्या तंटामुक्त गावांची यादी, त्यांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेसह जाहीर केली. एकूण १७ कोटी १३ लक्ष २५ हजार रुपयाचे बक्षीस राज्यातील अशा गावांना मिळणार आहेत.
अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०० गावांची निवड तंटामुक्त गाव म्हणून राज्य शासनाने केली आहे. यात दर्यापूर तालुक्यातील ८, अंजनगाव तालुक्यातील ४, चांदूर बाजार १७, वरुड, मोर्शी आणि चिखलदरा प्रत्येकी ९, तिवसा ६, चांदूर रेल्वे ५, नांदगाव खंडेश्वर ३, भातकुली आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी १, अमरावती २, आणि धारणी तालुक्यातील जिल्ह्यातून सर्वाधिक एकूण २६ गावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.