खुनाच्या आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:10 IST2016-05-14T00:10:09+5:302016-05-14T00:10:09+5:30
उधारीच्या पैशाच्या कारणावरुन भर दिवसा अंजनगाव सुर्जी येथील आठवडी बाजारात एका इसमाची हत्या केल्याप्रकरणी चिखलदरा तालुक्यातील सात्ती येथील रहिवासी असलेल्या ...

खुनाच्या आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
परतवाडा : उधारीच्या पैशाच्या कारणावरुन भर दिवसा अंजनगाव सुर्जी येथील आठवडी बाजारात एका इसमाची हत्या केल्याप्रकरणी चिखलदरा तालुक्यातील सात्ती येथील रहिवासी असलेल्या बापुराव लक्ष्मणराव याला अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
अंजनगाव पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक ८७/२०१४ रोजी कलम ३०१ प्रमाणे आरोपी बापूराव लक्ष्मणराव (वय ३८ वर्षे रा. सत्ता.ता.चिखलदरा) याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीने सुधाकर देवीसिंग राठोड (मृत) राहणार रुर्फफाटा तालुका चिखलदरा यास उधारीच्या पैशाचे वादावरुन भरदिवसा आठवडी बाजार अंजनगाव सुर्जी या ठिकाणी चाकूने छातीत भोसकून त्याचा निर्घृण खून केला.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने त्यात सरकारी पक्षातर्फे भोला चौहाण शासकीय सहायक अधिवक्ता यांनी सरकारतर्फे भक्कम बाजू मांडली. सदरचे प्रकरणात सरकारतर्फे १२ सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर गुन्ह्याचे गांभीर्य व तथ्य मांडले परिणामी आरोपी यास ३०४ भाग-१ भादंवि या कलमान्वये मृतक सुधाकर देवीसिंग राठोड यांचा खून केल्याबाबत दोषी धरुन न्यायालयाने आरोपीस १० वर्षाची सक्त मजुरीचा कारावास व रुपये ३००० दंड अशी शिक्षा सुनावली.
सदरचा न्यायनिर्णय हा न्यायाधीय एस.बी. हेडावू जिल्हा न्यायाधीय-३ तथा सत्र न्यायाधीश, अचलपूर यांनी दिनांक १२ मे २०१६ रोजी दिला. सदरच्या न्यायनिर्णयामुळे न्याय मिळाल्याची भावना जनमानसात व्यक्त होत आहे.
तसेच कायद्याची बाजू बळकट झाल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. या घटनेमुळे त्यावेळी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)