१० हजार वीज जोडण्या प्रलंबित
By Admin | Updated: May 15, 2016 00:10 IST2016-05-15T00:10:16+5:302016-05-15T00:10:16+5:30
शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे.

१० हजार वीज जोडण्या प्रलंबित
महावितरणची धिमी गती : शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ
अमरावती : शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात सिंचित क्षेत्रासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे वाट पहावी लागत आहे. मागील वर्षात वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्यांपैकी तब्बल १० हजार ७१२ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. दरवर्षी महावितरणकडून धीम्या गतीने होत असलेल्या वीज जोडणीमुळे यंदाही अर्जदार शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळेल, याची शाश्वती नसल्याची स्थिती आहे. दुष्काळातही सिंचन सुविधा असतानाही कृषी पंपाकरिता वीज जोडणी मिळविण्यात येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर पीक वाचविण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.
महावितरण सकारात्मक धोरण ठेवत यासंदर्भातील अडसर दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी उत्पादकता वाढ व प्रयोगशीलता जपण्याचे आवाहन एकीकडे शासनाकडून होत असताना शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मात्र दुसरीकडे खीळ घालण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. जिल्ह्यासह राज्यात ३१ मार्च २०१५ पर्यंत महावितरणकडे ३८ लाख १२ हजार ६९८ कृषीपंप ग्राहक आहेत. यापैकी मागील वर्षी एक लाख १० हजार ४६ कृषिपंपाला वीजजोडणी देण्यात आली. सुरक्षा अनामत भरून वीजजोडणीसाठी १ लाख ७३ हजार ७५२ अर्ज प्रलंबित आहेत. मात्र त्यानंतरही कृषिपंपांचा अनुरोष कायम असल्याने तो दूर करण्याची मागणी होत आहे. सध्या महावितरणच्या नियमानुसार तीन एचपीच्या वीज कनेक्शनच्या एक ते पाच खांबांसाठी पोल महावितरण पाच हजार १०० रुपये घेते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार आठ दिवसांत वीज कनेक्शन देणे बंधनकारक आहे. परंतु सध्या या सर्व गोष्टीला महावितरणकडून दुजोरा दिला असून वीजजोडणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)