तूर खरेदीसाठी १० दिवसांची ‘डेडलाईन’

By Admin | Updated: May 4, 2017 00:02 IST2017-05-04T00:02:07+5:302017-05-04T00:02:07+5:30

जिल्ह्यातील ११ केंद्रांवर खरेदीच्या प्रतीक्षेत अद्यापही दोन लाख ३० हजार ७०० क्विंटल तूर पडून आहे.

10-day deadline for purchase of tur | तूर खरेदीसाठी १० दिवसांची ‘डेडलाईन’

तूर खरेदीसाठी १० दिवसांची ‘डेडलाईन’

अमरावती : जिल्ह्यातील ११ केंद्रांवर खरेदीच्या प्रतीक्षेत अद्यापही दोन लाख ३० हजार ७०० क्विंटल तूर पडून आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली असून यासर्व केंद्रांवर आता दोन पाळ्यांमध्ये तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुद्धा तूर खरेदी करण्यासाठी व मोजणीचा वेग वाढण्यासाठी किमान १० वजन काटे लावण्याचे व ही संपूर्ण प्रक्रिया आठ ते दहा दिवसांत संपविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
अपर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी यांनी अमरावतीसह काही इतर बाजार समित्यांना भेट देऊन तूर खरेदी व मोजणी प्रक्रियेची पाहणी केली. या केंद्रांवर केवळ चार ते सहाच वजन काटे असल्यामुळे तूर मोजणीला वेग लागत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ दहा अतिरिक्त वजन काटे लावण्याचे आदेश दिलेत. व्हीसीएमएफच्या केंद्रावर ग्रेडर व बारदाण्याची अडचण निकाली काढण्यात आली आहे.

‘व्हीसीएमएफ’द्वारा मंगळवारी ६ हजार क्विंटल खरेदी
अमरावती : याकेंद्रावर चार सदस्यीय पथक ग्रेडिंग करणार असून ५२ हजार बारदाना उपलब्ध करण्यात आल्याने मोजणीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील डीएमओ, व्हीसीएमएफचे प्रत्येकी पाच व आदिवासी प्रकल्प विभागाचे एक असे ११ केंद्र सुरु आहेत. याकेंद्रांवर मंगळवारी ६२७ शेतकऱ्यांची १२,०६६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. याआठवड्यात १,६२९ शेतकऱ्यांची ३४,४६९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ‘व्हीसीएमएफ’ द्वारा २ एप्रिल रोजी २३४ शेतकऱ्यांची ५ हजार ८८९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे ५२ शेतकऱ्यांची ७७८ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर १९ शेतकऱ्यांची ३७३, मोर्शी ४७ शेतकऱ्यांची ८३६, अमरावती ९८ शेतकऱ्यांची २९०१ व धामणगाव रेल्वे केंद्रावर ७० शेतकऱ्यांची १ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. (प्रतिनिधी)

जिल्हा प्रशासन गंभीर : प्रत्येक केंद्रावर १० वजनकाटे लावण्याचे आदेश
‘डीएमओ’च्या केंद्रावर
१.७९ लक्ष क्विंटल खरेदी बाकी
डीएमओअंतर्गत पाच केंद्रांवर ७ हजार २८१ शेतकऱ्यांची एक लाख ७८ हजार ४९० क्विंटल तुरीची मोजणी बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर १५७७ शेतकऱ्यांची ५४२५८ क्विंटल, अंजनगाव सुर्जी केंद्रावर १२२७ शेतकऱ्यांची २५२२५ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर २८५१ केंद्रावर ५१,५४१ क्विंटल, चांदूरबाजार केंद्रावर ७४६ शेतकऱ्यांची १८,४०० क्विंटल व वरुड केंद्रावर ८८० शेतकऱ्यांची २९,०६६ क्विंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे.

जिल्ह्यातील ११ ही केंद्रांवर तूर खरेदी सुरू आहे. येत्या ८ ते १० दिवसांत तूर खरेदी पूर्ण करण्याचे निर्देश सर्व तहसीलदार व केंद्रांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह आम्ही सर्व चोवीस तास शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहोत.
- के.पी.परदेशी
अप्पर जिल्हाधिकारी

ताडपत्रीने झाकली तूर
दर्यापूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २२ तारखेपर्यंत ६९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली तर सुमारे ५१ हजार ७४१ पोते बाजार समितीच्या यार्डात शिल्लक होते. शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर बुधवारपर्यंत ४ हजार ५९३ क्विंटलची खरेदी झाली असून अद्यापही यार्डात सुमारे ४५ हजार पोते शिल्लक आहेत. मोजणीची प्रक्रिया आणखी दहा दिवस चालेल, असे सांगण्यात आले आहे. पावसाची चिन्हे पाहता यार्डात तुरीला झाकण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. पावसात भिजून शेतकऱ्यांची हानी होऊ नये, यासाठी बाजार समिती तत्पर असल्याचे बाबाराव पाटील बरवट यांनी सांगितले. याच दरम्यान यार्डातून चार पोते तूर चोरीला गेल्याची तक्रार आषुतोष वडतकर या शेतकऱ्याने केली होती. चौकशी केली असता त्याची तूर जुगल वडतकर यांच्या नावे असल्याचे लक्षात आले. मात्र, असे जाणीवपूर्वक करण्यात आले असेल तर त्यावर कारवाई केली जाईल, असे बाजार समितीचे सचिव साहेबराव जामनिक यांनी सांगितले. तुर्तास तुरीच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 10-day deadline for purchase of tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.