जिल्ह्यात १ हजार ८१ नगरपरिषद कर्मचारी संपावर
By Admin | Updated: July 15, 2014 23:54 IST2014-07-15T23:54:21+5:302014-07-15T23:54:21+5:30
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अमरावती जिल्ह्यातील १० नगरपरिषदांमधील १ हजार १५१ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे सुमारे १ हजार ८१ कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे याठिकाणचे प्रशासकीय

जिल्ह्यात १ हजार ८१ नगरपरिषद कर्मचारी संपावर
अमरावती : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अमरावती जिल्ह्यातील १० नगरपरिषदांमधील १ हजार १५१ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे सुमारे १ हजार ८१ कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे याठिकाणचे प्रशासकीय व स्वच्छतेची सर्व कामे ठप्प झाली आहे. या संपामध्ये नगरपरिषदांमधील अतिआवश्यक असलेल्या अग्निशमन, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहे.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्य शासनातर्फे देण्यात येणारे वेतन ८० ऐवजी शंभर टक्के देण्यात यावे, सन २००० पूर्वी पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित करावे, अनुकंपाधारकांच्या जागा भराव्यात आदी मागण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून संप सुरू केला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नगरपालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून होमगार्डची मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)
चांदूररेल्वेतील ३८ कर्मचारी संपावर
चांदूररेल्वे: नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात चांदूररेल्वे नगरपालिकेचे ४४ पैकी ३८ कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे स्वच्छतेचे कामकाज प्रभावित झाले आहे. कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन पाणीपुरवठा व चार कर्मचारी अस्थाई असल्याने तेच कर्मचारी सहा कार्यालयात आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश खवले यांनी दिली. कर्मचारी संपावर असल्याने नागरिकांना आल्या पावली परतावे लागले. यात सफाई कामगारही सामील केल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहे.
चांदूरबाजारमध्ये कामे रखडली
चांदूरबाजार : नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या संपाला सुरूवात केल्यामुळे नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. स्थानिक नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभाग वगळता सर्व ६४ कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. या संपामुळे नगरपरिषदेसंबंधित कामे पूर्णपणे रखडली आहेत. विशेष म्हणजे पावसाने आता हजेरी लावल्याने गावात तसेच नगरपरिषदेच्या हद्दीत स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील सर्व सफाई कामगार संपात सहभागी असल्यामुळे संप सुरुच राहिल्यास स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा ठाकणार आहे.