जि.प. कर्मचारी भवनात उभारणार काेविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:07+5:302021-04-21T04:19:07+5:30
अकाेला : महानगरातील रूग्णांना आराेग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही महापालिकेने काेविड सेंटर सुरू करण्याबाबत उदासीनता दाखविली आहे. ...

जि.प. कर्मचारी भवनात उभारणार काेविड सेंटर
अकाेला : महानगरातील रूग्णांना आराेग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही महापालिकेने काेविड सेंटर सुरू करण्याबाबत उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद यासाठी पुढाकार घेणार असून जिल्हा परिषद कर्मचारी भवनात ५० खाटांचे काेविड सेंटर उभारणार असल्याची घाेषणा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
अकाेला जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानी मंगळवारी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते . ॲड आंबेडकर म्हणाले की, महापालिकेने नागरिकांकडून भरमसाठ मालमत्ता कर वसूल केला. त्या तुलनेत नागरिकांना सुविधा देण्यात महापालिका मात्र सपशेल अपयशी ठरली आहे. शहरातील भरतीया रूग्णालय अद्ययावत करण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप त्यांनी केला. शहरातील रूग्णांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात ५० खाटांचे काेविड सेंटर उभारणार असून त्याकरिता दानशूरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी वंचितचे उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भाेजने, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, प्रदीप वानखडे, डाॅ. प्रसेनजित गवई आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स...
रूग्णाचे देयक आधी तपासण्यासाठी नाेडल अधिकारी नेमा
खासगी रूग्णालयात काेराेना बाधित रूग्णांची माेठी लूट हाेत असल्याच्या तक्रारी आहेत. देयका संदर्भात तक्रारी असल्यास देयक दिल्यानंतर ते जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीकडे जाते. त्या ऐवजी रूग्णांना सुटी देण्याआधीच ते देयक तपासण्यात यावे. त्यासाठी खासगी रूग्णालयांसाठी नाेडल अधिकारी नेमावा. त्यांनी देयक मंजूर केल्यावरच रूग्णांकडे साेपविण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. तसेच रूग्णांची डिपाॅझिटसाठी हाेणारी अडवणूक तत्काळ थांबवण्याची मागणीही त्यांनी केली.
बाॅक्स...
जिल्हा परिषदेतील खांदेपालटाचा निर्णय सुकाणू समितीवर अवलंबून
जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट हाेणार असल्याची चर्चा सुरू असून याबाबत जिल्हा परिषद सुकाणू समितीला अधिकार दिले आहेत. त्यांच्याकडून जसा अहवाल येईल त्यानुसार निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.