जि.प. सदस्यपतीने दलालास पकडले !
By Admin | Updated: August 23, 2016 01:08 IST2016-08-23T01:08:17+5:302016-08-23T01:08:17+5:30
घरकुल लाभार्थ्याची फाइल गहाळ करणा-या दलालास पकडल्याची घटना.

जि.प. सदस्यपतीने दलालास पकडले !
अकोला, दि. २२ : इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्याची फाइल गहाळ करणार्या एका दलालास जिल्हा परिषदेच्या एका महिला सदस्यपतीने पकडल्याची घटना सोमवारी दुपारी अकोला पंचायत समितीच्या बांधकाम विभागात घडली. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे (सीईओ) तक्रार देण्यात आली.
इदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी अनुदानाच्या दुसर्या हप्त्याच्या रकमेसाठी हिंगणी बु. येथील एका लाभार्थ्याने प्रस्ताव सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रेणुका दातकर यांचे पती गोपाल दातकर सोमवारी अकोला पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आले होते. संबंधित लाभार्थ्याच्या अनुदानाबाबत प्रस्तावाच्या फाइलबाबत त्यांनी विचारणा केली असता, तेथे सुशिक्षित बेरोजगार म्हणून काम करणार्या राष्ट्रपाल इंगळे याने फाइल उपलब्ध नसल्याचे सांगितले. राष्ट्रपाल पंचायत समितीचा कर्मचारी नसताना घरकुल अनुदानाच्या फाइल हाताळत असल्याचे लक्षात येताच गोपाल दातकर यांनी त्यास पकडले. ही बाब त्यांनी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी पंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. पंचायत समितीत कर्मचारी नसताना घरकुल अनुदानाच्या फाइल हाताळणारा राष्ट्रपाल हा दलाल असल्याचा आरोप करीत, दातकर यांनी यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार सादर केली.