जि.प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी ५२ लाखांची लोकवर्गणी !

By Admin | Updated: March 28, 2016 01:23 IST2016-03-28T01:23:25+5:302016-03-28T01:23:25+5:30

कारंजा तालुक्यात पं.स. शिक्षण विभागाचा पुढाकार.

Zip 52 lakhs for the modernization of schools! | जि.प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी ५२ लाखांची लोकवर्गणी !

जि.प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी ५२ लाखांची लोकवर्गणी !

दादाराव गायकवाड/ कारंजा लाड (जि. वाशिम)
तालुक्यातील ४0 जिल्हा परिषदेच्या शाळांचे आधुनिकीकरण करून त्यांना कॉन्व्हेंटच्या तुल्यबळ करण्याचा संकल्प पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केला आहे. त्याकरिता शासनाच्या निधीसोबतच ५२ लाख रुपयांची लोकवर्गणीही गोळा करण्यात आली आहे.
इंग्रजी शाळांमध्ये पाल्यांना दाखल करून घेण्यासाठी पालकांचा कल वाढू लागला आहे. या स्पर्धेमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना घरघर लागल्याचे चित्र आहे. यामुळे या शाळांचा दर्जा व गुणवत्ता टिकवण्यासाठी कारंजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४0 प्राथमिक शाळांमध्ये लोकसहभागातून डिजिटल क्लासरूम उपक्रम सुरू केला आहे.
कारंजा तालुक्यात एकूण २५३ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या एकूण १४५ शाळा आहेत. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या अहवालानुसार कारंजा तालुक्यातील २७ शाळांची पटसंख्या ही २0 पेक्षा कमी आहे. या शाळांविषयी शिक्षण विभागाने निश्‍चित असा निर्णय घेतला नसला, तरी या शाळांना पटसंख्येअभावी कुलूप लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शाळेतील संख्या वाढविण्यासाठी दर्जा वाढविणे आवश्यक असल्यामुळे या शाळांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या मार्गदर्शनात या शाळांमध्ये लोकसहभागातून डिजिटल उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील ४0 शाळा डिजिटल करण्यात आल्या असून, त्यासाठी तब्बल ५२ लाख रुपयांची लोकवर्गणी गोळा करण्यात आली आहे. या लोकवर्गणीत शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या निधीतील थोडी रक्कम गुंतवून एलसीडी प्रोजेक्टर, संगणक, टॅबलेट असे आधुनिक साहित्य खरेदी करण्यात आले. या साहित्यांच्या माध्यमातून शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. या उपक्रमाची उपयोगीता पाहता इतरही गावांतील लोक आता जि.प.च्या शाळांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

Web Title: Zip 52 lakhs for the modernization of schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.