जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे २0 ठराव कायम!
By Admin | Updated: March 22, 2016 02:19 IST2016-03-22T02:19:08+5:302016-03-22T02:19:08+5:30
विभागीय आयुक्तांचा आदेश; ‘कोंबडी’ योजनेसह दोन ठराव निलंबित.

जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे २0 ठराव कायम!
अकोला: जिल्हा परिषदेच्या गत २६ फेब्रुवारी रोजीच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आलेले २२ पैकी २0 ठराव कायम ठेवण्यात येत असून, कोंबडी वाटप योजनेसह दोन ठराव निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी १८ मार्च रोजी दिला.
गत २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत विविध २२ विषयांना मंजुरी देण्यात येत असल्याचे ठराव मंजूर करण्यात आले; परंतु विशेष सभेत मंजूर करण्यात आलेले २२ ठराव बेकायदशीर पारित करण्यात आले. त्यामुळे पारित करण्यात आलेले बेकायदेशीर ठराव खारीज करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन टाले (देशमुख) यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत केली होती. या प्रकरणात गत आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान, याचिकाकर्ते सदस्य नितीन देशमुख तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई आणि सभेचे सचिव तथा जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. आर. तापी यांचे म्हणणे नोंदविण्यात आले.
तिन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर, २६ फेब्रुवारी रोजीच्या जिल्हा परिषद विशेष सभेत पारीत करण्यात आलेले विषय क्रमांक २0 व २१ बाबतचे ठराव वगळता पारित करण्यात आलेले इतवृत्तासह इतर सर्व २0 ठराव जनहित लक्षात घेता, कायम ठेवण्यात येत असून, विषय क्रमांक २0 व २१ बाबतचे ठराव निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी १८ मार्च रोजी दिला. विशेष सभेत पारित करण्यात आलेल्या विषय क्र. २0 व २१ वगळता इतर सर्व विषयांबाबत ठरावांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असा आदेशही विभागीय आयुक्तांनी दिला आहे.
विभागीय आयुक्तांनी निलंबित केलेल्या दोन ठरावांपैकी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या कुक्कुटपालन (कोंबडी) वाटप योजनेबाबत ठरावांचा समावेश आहे.