Zilla Parishad elections will be held on the basis of reservation | ठरलेल्या आरक्षणानुसारच होणार जिल्हा परिषदेची निवडणूक
ठरलेल्या आरक्षणानुसारच होणार जिल्हा परिषदेची निवडणूक

- सदानंद सिरसाट
अकोला: जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना, गट, गणांचे आरक्षण, जागांची संख्या मे २०१९ मध्येच निश्चित करण्यात आली. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया होत आहे. त्याचा फटका गेल्या काळात जिल्हा परिषदेच्या सभागृहात असलेल्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनाही बसला आहे. आता त्यांना नव्या खेळीतून सभागृह गाठावे लागणार किंवा कुटुंबातील इतर व्यक्तिला पुढे करावे लागणार आहे.
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित जागांची संख्या, गट, गण मे महिन्यातच निश्चित करण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (नामाप्र) १४ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ गट आहेत. जिल्हा परिषदेच्या ५३ गटांच्या आरक्षणात सर्वसाधारणसह आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी ५३ पैकी २७ गट राखीव आहेत.


- जिल्हा परिषद गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण!
अनुसूचित जाती गट : सर्वसाधारण - उगवा, वरुर, राजंदा,भांबेरी, कान्हेरी सरप, सस्ती. स्त्रीयांसाठी राखीव- व्याळा, पारस, हातरुण, चांदूर, बोरगावमंजू, हातगाव.
अनुसूचित जमाती गट : सर्वसाधारण - पिंपळखुटा, जनुना. स्त्रीयांसाठी राखीव- अकोली जहागीर, महान, आगर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण - अकोलखेड, लाखपुरी, घुसर, कानशिवणी, अंदुरा, देगाव, शिर्ला. स्त्रीयांसाठी राखीव - दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., कुटासा, बपोरी, कुरणखेड, दगडपारवा.


- गटांतून विस्थापित झालेले पदाधिकारी
गट राखीव झाल्याने निवडणूक प्रक्रियेतून विस्थापित झालेल्यांमध्ये प्रमुख दहा पदाधिकारी आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शरद गवई, माजी उपाध्यक्ष गुलाम नबी हुसेन देशमुख, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, माजी सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रोपदा वाहोकार या पदाधिकाऱ्यांना विस्थापित व्हावे लागत आहे. त्याशिवाय, माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते रमण जैन, गोपाल कोल्हे, सम्राट डोंगरदिवे, प्रतिभा अवचार, ज्योत्स्ना चोरे, चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनाही त्यांच्या गटांतून धक्का बसला.


- अध्यक्षपदासाठी अनेक उतरणार रिंगणात
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वांसाठी खुले असल्याने त्यासाठी आता अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यापैकी जिल्हा परिषदेची सत्ता गाजवलेल्यांमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, माजी कृषी सभापती राजू बोचे, सेवकराम ताथोड यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागत आहे. तर माजी उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, गजानन पुंडकर, माजी सदस्य प्रदीप वानखडे, शोभा शेळके यांना त्यांच्याच गटात संधी आहे. 
निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेत अकोला तालुक्यातील आगर गटातून शिवसेनेचे महादेव गवळे, घुसर गटातून भाजपच्या निकिता रेड्डी, उगवा गटातून भाजपच्या पद्मावती भोसले, चिखलगावातून संतोष वाकोडे यांना धक्का बसला. पारसमधून रामदास लांडे, अंदुरामधून सुनीता गोरे, निमकर्दामधून विलास इंगळे, अकोली जहागीरमधून अपक्ष ज्योत्स्ना बहाळे, पिंजरमधून अक्षय लहाने, जनुनातून गीता राठोड यांच्यासह इतरही सदस्यांना त्यांच्या हक्काच्या गटातून विस्थापित व्हावे लागले आहे. 


- राजकारणात महिलांना पुढे आणण्याची संधी
काही पदाधिकारी, सदस्यांना त्यांच्याऐवजी पत्नीला राजकारणात आणण्याची संधी महिलांसाठी राखीव गटांमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष, सभापती अरबट, भाजपचे जैन, अक्षय लहाने, सम्राट डोंगरदिवे, गोपाल कोल्हे यांच्या कुटुंबातून महिला सदस्य पुढे येऊ शकतात. 

 

Web Title: Zilla Parishad elections will be held on the basis of reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.