अकोल्यातील तरुणांनी अमरावतीत केले तरुणीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:10 IST2019-08-03T15:08:20+5:302019-08-03T15:10:53+5:30
अकोला : प्रेम प्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या दोन युवकांना अमरावती पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले व अपहृत युवतीला सोडविले.

अकोल्यातील तरुणांनी अमरावतीत केले तरुणीचे अपहरण
अकोला : प्रेम प्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या दोन युवकांना अमरावती पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले व अपहृत युवतीला सोडविले. ही घटना शुक्रवारी अमरावती शहरातील गाडगेनगर हद्दीत दुपारी घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीच्या नवसारी पॉवर हाऊससमोरून एका तरुणीला वाहनात कोंबून पळवून नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपहरणात मदत करणाºया एका मुलीला प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पकडून ठेवले होते. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. यादरम्यान अपहरणकर्त्या तरुणाचे मोबाइल लोकेशनसुद्धा ट्रेस केले. पोलिसांनी तात्काळ चारचाकी वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. ज्या दिशेला अपहरणकर्ते गेले होते, त्या दिशेकडे तपास सुरू केला असता, सदर वाहन दृष्टीस पडले. या वाहनाचा पाठलाग करून येसुर्णा ते असदपूर मार्गावर वाहन ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात सदर युवतीचा प्रियकर गोपाल ऊर्फ महेंद्र रमेश गाडे (२५, रा. शिवर, जि. अकोला) व याप्रकरणात मदत करणारा मित्र शुभम नंदकिशोर झापर्डे (१९, रा. अकोला) यांना पोलिसांनी अटक केली तसेच चारचाकी वाहनासह एक दुचाकी जप्त केली. युवतीला अकोल्याला पळवून नेण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, अवघ्या दोन तासांत अपहृत तरुणीला मुक्त केले. पोलिसांनी अपहृताच्या पित्याच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
प्रेम प्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध
मुलगी व तिचे अपहरण करणारा गोपाल गाडे हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेम आहे. गोपाल अनेकदा प्रेयसीला घेऊन अकोला येथे गेला. दोघांनीही मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे. मात्र, या प्रेम प्रकरणाला मुलीचे कुटुंबीय विरोध करीत होते. त्यामुळे गोपालने प्रेयसीच्या अपहरणाची योजना आखली. ही बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे.
तरुणांविरुद्ध गुन्हा
पीडिताच्या वडिलांनी गाडगेनगर पोलिसांत सायंकाळी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल रमेश गाडे (२५) व शुभम नंदकिशोर झापर्डे (२१, रा. शिवर, अकोला) विरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.