सोने चकाकून देणा-या दोघांना युवकांनी चोपले!
By Admin | Updated: February 29, 2016 02:40 IST2016-02-29T02:27:01+5:302016-02-29T02:40:56+5:30
आकोट फैलमधील घटना, खिळ्यांच्या साहाय्याने केले चांदीचे वजन कमी.

सोने चकाकून देणा-या दोघांना युवकांनी चोपले!
अकोला: आकोट फैलमध्ये रविवारी परराज्यातील दोघांनी सोने व चांदी चकाकून देण्याच्या नावाखाली एका महिलेच्या घरातील चांदीचे वजन कमी केल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार महिलेच्या निदर्शनास येताच तिने आरडाओरड केला. परिसरातील युवकांनी धाव घेऊन या दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी आकोट फैलमध्ये घडला.
आकोट फैलमध्ये एक वृद्ध व त्याच्यासोबत असलेल्या युवकाने काही महिलांच्या घरी जाऊन सोने व चांदीचे दागिने चकाकून देण्याचे आमिष दाखविले. यावरून एका महिलेने चांदीची काही भांडी चकाकून देण्यासाठी या दोघांकडे दिली. एकाने हे भांडे गरम पाणी असलेल्या त्यांच्या एका टोपल्यात काही वेळ ठेवले. या टोपल्यामध्ये तळाशी असलेल्या लोखंडी खिळ्यांसोबत चांदीची भांडी तब्बल १५ ते २0 मिनिटे घासली गेली. त्यामुळे भांड्यांवरील चांदीचा मुलामा कमी झाला. त्यानंतर सदर चांदीची भांडी थंड पाण्यात धुवून महिलेला परत करण्यात आली. या भांड्यांचे वजन कमी झाल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने आरडाओरड केली.
परिसरातील युवकांनी महिलेच्या घराकडे धाव घेऊन सोने व चांदी चकाकून देणार्या दोघांनाही झोडपले. महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाण्याचा पवित्रा घेताच या दोघांनी एका भांड्यात जमा केलेली चांदी परत केली. परराज्यातील असलेल्या या दोघांची ही हातचलाखी महिलेच्या समयसूचकतेमुळे समोर आली. दोघांनीही महिलेस क्षमा मागितल्यानंतर प्रकरण आपसात करण्यात आले.