लाचखोरांविरुद्ध तक्रार करणा-यांमध्ये युवक आघाडीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 21:03 IST2016-01-28T21:03:38+5:302016-01-28T21:03:38+5:30
तक्रारदार युवकांचे प्रमाण ३६ टक्के.

लाचखोरांविरुद्ध तक्रार करणा-यांमध्ये युवक आघाडीवर!
नितीन गव्हाळे/अकोला: गत वर्षभरापासून लाचखोरांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई आणि सोबतच जनजागृतीही करण्यात येत असल्याने, लाचखोरांविरुद्ध तक्रारींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या तक्रारी करणार्यांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गतवर्षी २६ ते ३५ वर्षे वयोगटातील ३६१ युवकांनी लाचखोरांविरुद्ध तक्रारी नोंदविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
शासनाकडून भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने जनजागृती सुरू असते. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेसुद्धा कामामध्ये गती आणत, कारवाया वाढविल्या आहेत. २0१४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२४५ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या, तर २0१५ मध्ये १२३४ लाचखोरांना गजाआड केले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. आपल्या तक्रारींमधून तरुणाईची भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची वृत्ती दिसून येत आहे. २0१४ मध्ये लाचखोरांविरुद्ध तक्रार करणार्या युवकांची संख्या ३३८ होती, तर गतवर्षी २0१५ मध्ये त्यात आणखी वाढ झाली. २0१५ मध्ये ३६१ युवकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी नोंदविल्या. वृद्धांमध्ये मात्र लाचखोरांविरुद्ध तक्रारी करण्याबाबत उदासीनता दिसून येते. वृद्धांचे तक्रार करण्याचे प्रमाण केवळ पाच टक्के आहे. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवकांमध्येही तक्रार करण्याचे प्रमाण १२ टक्के एवढे लक्षणीय असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
तक्रारदारांची वयानुसार वर्गवारी
वय तक्रारदार
२५ वर्षांपेक्षा कमी ११६
२६ ते ३५ वर्षे ३६१
३६ ते ४५ वर्षे २७८
४६ ते ६0 वर्षे १८९
६0 वर्षांपेक्षा अधिक ४७