लग्नाचा बस्ता घेण्यापूर्वीच सिरसो येथील युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:41 IST2018-03-12T18:41:37+5:302018-03-12T18:41:37+5:30
मूर्तिजापूर/सिरसो : सिरसो येथील नवीन वस्तीत राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

लग्नाचा बस्ता घेण्यापूर्वीच सिरसो येथील युवकाची आत्महत्या
मूर्तिजापूर/सिरसो : सिरसो येथील नवीन वस्तीत राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. अतुल बाबूलाल चोटमल असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे नुकतेच लग्न ठरले होते आणि १२ मार्च रोजी त्याच्या लग्नाचे कपडे खरेदी करण्याचा बेत होता. कपडा घेण्यापूर्वीच युवकाने जगाचा निरोप घेतला. याप्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर शहरापासून जवळच येत असलेल्या सिरसो येथील नवीन वस्तीमध्ये राहत असलेला अतुल बाबूलाल चोटमल रा. गौतम नगर याने १२ मार्च रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोरील जनावरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गौतम नगर नवीन वस्ती येथे एकच खळबळ उडाली आहे. अतुल चोटमल याचे लग्न जुळले होते आणि १२ मार्च रोजी लग्नाचे कपडे खरेदी करणार होते. त्यापूर्वीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह तपासणीकरिता स्थानिक श्रीमती लदेसा सामान्य उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास ग्रामीणचे पो.काँ. दिलीप खंडारे, सतीश बोधडे, संजय शिंगणे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)