लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी गोवलेला युवक दोषमुक्त!
By Admin | Updated: May 10, 2017 07:19 IST2017-05-10T07:19:18+5:302017-05-10T07:19:18+5:30
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चेह-याशी साम्य असल्यामुळे निर्दोष युवकाला पोलिसांनी गोवले.

लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी गोवलेला युवक दोषमुक्त!
अकोला: टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्समध्ये दहा वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चेह-याशी साम्य असल्यामुळे निर्दोष युवकाला पोलिसांनी गोवले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकसुद्धा केली होती. या युवकाला अखेर न्याय मिळाला असून, जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने मंगळवारी त्याला दोषमुक्त करण्याचा आदेश दिला.
एका दहा वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर नेऊन निर्जनस्थळी तिच्यावर दोघा नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला होता. रामदासपेठ पोलिसांनी सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींची धरपकड सुरू केली होती. आरोपीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेल्या प्रवीण चव्हाण (रा. माळीपुरा) याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीसुद्धा सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध भिकारी गोविंद साखरे याला अटक केली होती. त्याच्याकडून मुख्य आरोपींची नावे मिळाली. पोलिसांनी मुख्य आरोपी व प्रवीणच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य असल्याने त्याला अटक करावी लागली. त्याचा घटनेशी संबंध नाही, असे तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले होते. पोलिसांच्या चुकीमुळे निष्पाप प्रवीण चव्हाणला विनाकारण पोलीस कारवाईला सामोरे जाऊन गजाआड व्हावे लागले होते. पोलिसांच्या कृत्याचा मनस्ताप प्रवीण व त्याच्या कुटुंबीयांना सहन करावा लागला. समाजात बदनामी झाली ती वेगळी. त्यामुळे प्रवीण चव्हाण याने न्यायालयात आपल्याला न्याय मिळावा आणि या प्रकरणातून दोषमुक्त करावे, यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्याची बाजू ऐकल्यानंतर त्याला या प्रकरणातून दोषमुक्त केले. त्याच्या वतीने अॅड. केशव एच. गिरी, अॅड. वैशाली भारती यांनी बाजू मांडली.