तहसीलदारांच्या कक्षासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Updated: June 20, 2015 02:25 IST2015-06-20T02:25:28+5:302015-06-20T02:25:28+5:30
संग्रामपूर येथील घटना; अनर्थ टळला.

तहसीलदारांच्या कक्षासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
संग्रामपूर (जि. बुलडाणा ): शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्रे न मिळाल्याने त्रस्त झालेल्या युवकाने अखेर तहसीलदारांच्या कक्षासमोरच अंगावर रॉकेल घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना १९ जून रोजी दुपारी संग्रामपूर येथे घडली. तालुक्यातील जस्तगाव येथील अमोल शामराव भिलंगे या युवकाने बहिणी वैशाली शामराव भिलंगे हिचे अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव संग्रामपूर येथील सेतू कार्यालयामार्फत सादर केला होता. यासाठी सेतू कार्यालयाकडे वेळोवेळी चकरा मारल्या मात्र दाखला मिळाला नाही. बहिणीला पुढील वर्गात अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी दाखला महत्वाचा असल्याने अमोल भिलंगे हा १९ जून रोजी सेतू कार्यालयात आला मात्र त्याला सेतू कार्यालय बंद असल्याचे दिसले. त्यामुळे अमोल भिलंगे याने तहसीलदारांचा कक्ष गाठला. मात्र त्याचे समाधान न झाल्याने अमोल भिलंगे याने स्वत:चे अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अमोलच्या हातातील पेटती काडी फेकली व पुढील अनर्थ टळला. डोळ्यात रॉकेल गेल्याने अमोल यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.