यंदा कावड, पालखी सोहळ्याचा अमृत महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 16:13 IST2019-08-24T16:13:24+5:302019-08-24T16:13:34+5:30

श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळातर्फे यंदा कावड, पालखी महोत्सवाचा अमृत सोहळा साजरा करणार आहेत.

This year's Kawad Palakhi ceremony of Akola | यंदा कावड, पालखी सोहळ्याचा अमृत महोत्सव!

यंदा कावड, पालखी सोहळ्याचा अमृत महोत्सव!

अकोला : श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळातर्फे यंदा कावड, पालखी महोत्सवाचा अमृत सोहळा साजरा करणार आहेत. त्यानुषंगाने श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच २६ आॅगस्ट रोजी मंडळातर्फे विशेष तयारी करण्यात आली आहे. यंदा श्री राजराजेश्वराच्या मानाच्या पालखीवर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, विविध झाकी महोत्सवाचे विशेष आकर्षण राहणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी सांगितले.
कावड, पालखी महोत्सवाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, मंडळातर्फे हे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्यात येत आहे. यासंदर्भात शुक्रवार, २३ आॅगस्ट रोजी श्री राजराजेश्वर मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या अमृत महोत्सवात शिवभक्तांना नावीन्यपूर्ण आकर्षक झाकीचे दर्शन होणार आहेत. या झाकीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले जाणार आहेत. रविवारी रात्री गांधीग्राम येथून श्री राजराजेश्वराची पालखी निघाल्यावर रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. रात्रभराच्या प्रवासानंतर पालखीचे शहरात आगमन झाल्यावर सिटी कोतवाली चौकात पालखीचे जल्लोषात स्वागत केले जाईल. या ठिकाणी फेटा घालून महिला पारंपरिक वेशात पहिल्यांदाच श्री राजराजेश्वराची पालखी घेणार आहेत. हा ऐतिहासिक क्षण ठरणार असून, जयहिंद चौक ते श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत पालखीवर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी केली जाईल. तसेच अमरावती येथूनही पालखी येणार असून, पालखीला १३७ क्रमांक दिल्याची माहिती यावेळी चंद्रकांत सावजी यांनी दिली. या सोहळ्यात सर्वच जाती-धर्माच्या समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर उखर्डे, राजू बुंदेले अ‍ॅड. पप्पू मोरवाल व नारायणराव गाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

महोत्सवाचे विशेष आकर्षण

  • संत गजानन महाराज, शेगाव संस्थानची दिंडी
  • दिंडीत १०० वारकऱ्यांचा असणार सहभाग
  • शिव-पार्वती, श्रीगणेश व कार्तिकेय यांची झाकी
  • ढोल पथक व पारंपरिक दिंडी झांज
  • १४० पेक्षा जास्त पालखी व शंभरपेक्षा जास्त कावड
  • सोहळ्याच्या पहिल्या पिढीतील सदस्यांचा होणार गौरव.

 

Web Title: This year's Kawad Palakhi ceremony of Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला