यंदापासून मनपा शाळेत बालवाडी

By Admin | Updated: April 27, 2017 01:11 IST2017-04-27T01:11:39+5:302017-04-27T01:11:39+5:30

अजय लहाने यांच्या शिक्षकांना कानपिचक्या: पटसंख्या वाढीचे दिले उद्दिष्ट

This year, kindergarten in the NMC School | यंदापासून मनपा शाळेत बालवाडी

यंदापासून मनपा शाळेत बालवाडी

अकोला : होय, आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या पालकांसाठी खुशखबर असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या शाळांमध्ये बालवाडी सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे ज्या पालकांना नाइलाजास्तव कॉन्व्हेंटचा मार्ग स्वीकारावा लागणार होता, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात बुधवारी आयोजित आढावा बैठकीत आयुक्त लहाने यांनी उपस्थित शिक्षकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
महापालिकेच्या ३४ शाळांमध्ये मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाचे ७ हजार २०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. शिवसेना वसाहतमधील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये इयत्ता दहावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. याव्यतिरिक्त इतर ३३ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी व इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या तुकड्या आहेत. साहजिकच इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्याने वयाची सहा वर्षे पूर्ण करण्याची अट असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असणारे पालकसुद्धा खासगी शाळांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत दरवर्षी घसरण होत असल्याचा अनुभव आहे. इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यम कायम ठेवणे, सेमी इंग्लिश माध्यमाला दूर सारण्याच्या प्रकारामुळे पोटाला पीळ देणाऱ्या पालकांनीदेखील महापालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवणे पसंत केले. परिणामी, पटसंख्या कायम ठेवण्यासाठी विद्यार्थीच सापडत नसल्याची परिस्थिती मनपाच्या शिक्षण विभागावर येऊन ठेपली आहे. शिवाय, गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत शिक्षण घेणे परवडत नसल्याची जाणीव ठेवून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी यंदाच्या शालेय सत्रापासून मनपा शाळांमध्ये बालवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आढावा बैठकीला उपायुक्त समाधान सोळंके, शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांच्यासह ३४ शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

निदान पगाराएवढे तरी काम करा!
शासनाकडून गलेलठ्ठ वेतन प्राप्त होत असले, तरी शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडल्याचे सांगत मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सभागृहात उपस्थित शिक्षकांचा चांगलाच समाचार घेतला. खासगी शाळांच्या तुलनेत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासल्यास शिक्षकांचा खरा चेहरा उघड होईल. त्यामुळे जेवढा पगार घेता, निदान तेवढे तरी प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला आयुक्त लहाने यांनी शिक्षकांना दिला.

एका शिक्षकाला दहा विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट
शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी मे व जून महिन्याच्या कालावधीत प्रत्येक शिक्षकाने दहा विद्यार्थ्यांना शोधून त्यांचा शाळा प्रवेश करण्याचे निर्देश आयुक्त अजय लहाने यांनी दिले. शाळांना आवारभिंत, चौकीदाराची व्यवस्था तसेच मूलभूत सुविधांसाठी निधी खर्च करण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कामचुकारपणा चालणार नाही!
अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेत पोहोचण्यासाठी शिक्षकांना तास-दीड तासाचा विलंब होतोच कसा, असा सवाल उपस्थित करीत यापुढे शिक्षकांची मनमानी खपवून घेणार नसल्याचा सज्जड इशारा आयुक्त लहाने यांनी दिला. शाळांमध्ये कोणत्या सुविधा पाहिजेत, त्याची इत्थंभूत माहिती सादर करा, सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगत आयुक्तांनी शिक्षकांना आश्वस्त केले.

अखेर पाठपुरावा कामी आला!
शहरातील गोरगरीब कुटुंबांतील चिमुकल्यांची कुचंबणा लक्षात घेता, मनपाने प्रत्येक शाळेत बालवाडी सुरू करून सेमी इंग्लिशचा प्रस्ताव लागू करण्यासाठी ‘लोकमत’ने सतत लिखाण केले. उशिरा का होईना, हा पाठपुरावा कामी आल्याची प्रतिक्रिया मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: This year, kindergarten in the NMC School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.