वर्षभरापासून गायब कर्मचा-यास केले रुजू
By Admin | Updated: December 20, 2014 00:45 IST2014-12-20T00:45:04+5:302014-12-20T00:45:04+5:30
अकोला जिल्हा हिवताप कार्यालयातील गैरप्रकार.

वर्षभरापासून गायब कर्मचा-यास केले रुजू
अकोला : पिजरनजीक पारद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य साहाय्यक म्हणून कार्यरत संदेश प्रधान ७ नोव्हेंबर २0११ ते २३ सप्टेंबर २0१४ या कालावधीत ड्युटीवरून गायब झाले होते. त्यानंतरही या कर्मचार्याला रुजू करून घेत आवश्यक असलेल्या नियम व अटी पायदळी तुडवण्याचा प्रताप जिल्हा हिवताप अधिकार्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शासकीय सेवेत कार्यरत असताना एखादा कर्मचारी एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ कुठलेही कारण न सांगता गैरहजर राहिल्यास सदर कर्मचार्यास पुन्हा रुजू करून घेताना स्थानिक पोलीस ठाण्याचा अहवाल मागवला जातो. या अहवालामध्ये एक वर्षामध्ये संबंधित कर्मचार्यावर गुन्हा दाखल झाला का, तुरुंगात होता का, याबाबत स्पष्टपणे नमूद केले जाते. यासोबतच वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्रही द्यावे लागते. त्यावर सदर कर्मचार्यास गत वर्षभराच्या काळात कोणता आजार झाला का, तो वर्षभरानंतर काम करण्यास फीट आहे का, याबाबतची पूर्ण शहनिशा केली जाते. यानंतरच कर्मचार्यास रुजू करून घेण्याचा नियम आहे. तथापि, जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकार्यांनी या प्रकाराची कुठलीही चौकशी न करता शासकीय नियम धाब्यावर बसवून संदेश प्रधान यांना कुरुम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रु जू केले आहे.
प्रधान यांनी यापूर्वी पारद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गवई यांच्यासोबतच वाद घातल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बोरगाव मंजू येथे असताना सर्वेक्षणाकरिता त्यांनी खासगी व्यक्तीची नेमणूक केली होती. या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर प्रधान यांना निलंबितही करण्यात आले होते. आता पुन्हा एक वर्ष गायब झाल्यानंतर प्रधान यांना नियम धाब्यावर बसवून कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे