कामगार कल्याण केंद्रांना द्यावी लागणार बाह्य रुग्ण सेवा!
By Admin | Updated: November 29, 2014 22:21 IST2014-11-29T22:21:45+5:302014-11-29T22:21:45+5:30
कल्याण आयुक्ताचे अहवाल सादर करण्याचे निर्देश.

कामगार कल्याण केंद्रांना द्यावी लागणार बाह्य रुग्ण सेवा!
हर्षनंदन वाघ /बुलडाणा
कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आजाराचे निदान करण्यासाठी, राज्यातील सर्वच कामगार कल्याण केंद्रांमध्ये बाह्य रुग्ण सेवा सुरू होणार आहे.
कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे, तसेच त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक उन्नती घडविण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या कामगार कल्याण केंद्रांच्या माध्यमातून आता कामगारांची रुग्णसेवा करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. कामगार कल्याण केंद्रांच्या बाह्य रुग्ण सेवा केंद्रांच्या माध्यमातून चर्म रोग, अस्थिरोग, हृदयरोग, सामान्य आजार, मुत्र रोग, तसेच नाक, कान, घशाच्या आजारांसोबतच, मानसिक आजारांचेही अचूक निदान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या कल्याण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, कामगार कल्याण केंद्रांचे अधिकारी कार्यालयात बाह्य रूग्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना करीत आहेत.
*अहवाल सादर करण्याचे निर्देश!
कामगार कल्याण केंद्रांमध्ये कामगार आणि कामगार कुटुंबीयांसाठी बाह्य रुग्ण सेवा सुरू करण्यासाठी तात्काळ अहवाल सादर करण्याचे स्मरणपत्र राज्यातील सर्वच केंद्र आणि उप-केंद्रांना देण्यात आले आहेत. त्यासाठी शासकीय, तसेच खासगी डॉक्टरांचे पॅनल तयार करण्यात येणार असून, पॅनलमधील डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी विशेष मोबदलाही कामगार कल्याण केंद्रांकडून दिल्या जाणार आहे. वेळेवर व अचुक आजाराच्या निदानासाठीच हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचे स्पष्ट निर्देश कल्याण आयुक्तांनी साहाय्यक कल्याण आयुक्तांना दिले आहेत.
*ईएसआयसीला अपयश
सध्या ह्यएम्प्लॉईज स्टेट इंश्युरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाह्ण (ईएसआयसी)च्या रूग्णालयांवर कामगार किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणी व उपचारांची जबाबदारी आहे. त्या रुग्णालयांमध्ये संबंधित तज्ज्ञ उपलब्ध नसल्यास, खासगी रूग्णालयातील तज्ज्ञांकडून उपचारासाठी पत्र, किंवा केंद्राचे कार्ड दिले जाते. खासगी तज्ज्ञ डॉक्टरांना कामगार कल्याण केंद्राकडून उपचाराचा खर्चही दिला जातो; मात्र अनेकदा ते तपासणी व उपचारास नकार देतात, असे अनुभव आहेत. त्यामुळेच कामगार कल्याण केंद्रांमध्ये बाह्य रूग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*२३२ ठिकाणी मिळणार सेवा
राज्यातील कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून एकूण २३२ ठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी बाह्य रूग्ण विभाग सुरू होणार आहे. त्यामध्ये कामगार कल्याण विभागाचे तीन प्रकल्प, ११ कामगार कल्याण भवन, २0 ललित कला भवन, १५ कामगार कल्याण उप-केंद आणि तीन ग्रामीण व समिती तत्वावरील केंद्रांचा समावेश आहे.