वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पाचे काम पाइप कालव्याद्वारे करा!
By Admin | Updated: June 9, 2016 01:56 IST2016-06-09T01:56:09+5:302016-06-09T01:56:09+5:30
जिगाव लिफ्ट कालव्याचेही काम पाइप लाइनद्वारे करण्याची भारत बोंद्रेंची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी.

वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पाचे काम पाइप कालव्याद्वारे करा!
चिखली (जि. बुलडाणा): विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करून, या प्रकल्पाचे तसेच जिगाव प्रकल्पाचे लिफ्ट व कालव्याद्वारे होणारे काम पाइप कालव्याद्वारे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
कालव्याची कामे पाइपद्वारे अथवा बंद नलिकाद्वारे करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पाण्याची प्रचंड प्रमाणात बचत होऊन अतिरिक्त सिंचनक्षेत्र उपलब्ध होण्यास मदत होईल, पाणी वाटपावरसुद्धा नियंत्रण राहून सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढेल तसेच भूसंपादनाचा खर्च वाचणार आहे.
१.७५ लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ शक्य
वैनगंगा ते नळगंगा जोड प्रकल्प तसेच जिगाव लिफ्ट व कालव्याची कामे पाइप लाइनद्वारे झाल्यास वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पांतर्गत १.५0 लाख हेक्टर आणि जिगाव प्रकल्पांतर्गत २५ हजार हेक्टर असे एकूण १.७५ लाख हेक्टर अतिरिक्त सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.