पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम जागेअभावी रखडले!
By Admin | Updated: May 9, 2017 04:40 IST2017-05-09T03:01:43+5:302017-05-09T04:40:02+5:30
जागेचा निर्णय आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समिती घेणार असल्याचे वृत्त आहे.

पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम जागेअभावी रखडले!
अकोला: विदर्भातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने अकोला येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे; पण महाविद्यालयासाठी लागणारी जागाच अद्याप मिळाली नसल्याने, नवीन पदवी महाविद्यालयाचे काम रखडले आहे. या जागेचा निर्णय आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समिती घेणार असल्याचे वृत्त आहे.
अकोला येथे राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. याकरिता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला पाच कोटी रुपये निधी दिला आहे. महाविद्यालयाला व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार,जागा हवी आहे. अकोल्यात स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा आहे, तेथे एमएससी ते पीएचडीपर्यंतचा अभ्यासक्रम आहे. बीएससी व्हेटरनरीच्या प्रथम वर्षाला ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने स्वतंत्र महाविद्यालयासाठी जागा हवी आहे. पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा असल्याने ३00 विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२0 विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५00 विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. यासाठी सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व वसतिगृहाची गरज भासणार आहे. महाराष्ट्र पशू विज्ञान (माफसू) विद्यापीठ प्रशासनाने जागेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. परंतु अद्याप जागेचा प्रश्न सुटला नसल्याने, विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळणे यावर्षी तरी कठीणच आहे. या पृष्ठभूमीवर माफसूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ४0 हेक्टर जागा मागितली आहे. कृषी विद्यापीठाने यासंदर्भात शिवरनजिकचा हायवे व गुडधी विभागातील जागा दाखविली; परंतु माफसूला वाशिम रोडवरील जागा हवी आहे. याबाबत शनिवारी पार पडलेल्या कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सभेत चर्चा झाली. सभेला कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. अमित झनक, नितीन हिवसे, गोपी ठाकरे, डॉ. सी.डी. मायी आदींची उपस्थिती होती. परिषदेने कृषी विद्यापीठाच्या जमीन संरक्षण समितीकडे हे प्रकरण सोपवले आहे. ११ मे रोजी या समितीची सभा होईल. कृषी विद्यापीठाच्या इतर सर्वच जागांसह पशू वैद्यकीय पदवी महाविद्यालयाच्या जागेबाबत या सभेत चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या समितीचे अध्यक्ष आ. गोपीकिशन बाजोरिया असून, आ. सावरकर, नितीन हिवसे, गोपी ठाकरे सदस्य आहेत.
माफसूची वाशिम रोडला पसंती
च्कृषी विद्यापीठाची गुडधी विभागाची जागा सुसज्ज आहे. येथे प्रशस्त रस्ता होत आहे. अभ्यासासाठी शांत वातावरण या भागात आहे. पण, माफसूला वाशिम रोडची जागा हवी आहे.
माफसूकडे ५0 हेक्टर जागा आहे. या जागेच्या मोबदल्यात आम्ही त्यांना वाशिम रोडची जागा देऊ, यासाठीचा करार करावा लागेल.
-आमदार गोपीकिशन बाजोरिया,अध्यक्ष, डॉ.पंदेकृवि जमीन संरक्षण समिती, अकोला.