जीवनदायी अंतर्गत राज्यातील पावणेदोन लाखांवर महिलांच्या शस्त्रक्रिया
By Admin | Updated: March 9, 2015 01:51 IST2015-03-09T01:51:12+5:302015-03-09T01:51:12+5:30
कर्करोगासह हृदयरोग व किडनीच्या दीड लाख शस्त्रक्रिया.

जीवनदायी अंतर्गत राज्यातील पावणेदोन लाखांवर महिलांच्या शस्त्रक्रिया
सचिन राऊत / अकोला: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील १ लाख ७६ हजार ३२७ महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्करोग, किडनी, डायलिसीससह हृदयरोगाच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. २६ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ह्यआरोग्य अभियान पंधरवडाह्ण राबविण्यात आला. यानिमित्त महिलांवर केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियांची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नोव्हेंबर २0१३ पासून नव्याने सुरू करण्यात आली. या योजनेत ८00 हून अधिक सेवांचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत राज्यातील १ लाख ७६ हजार ३२७ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या . यामध्ये ६२ हजार २१५ कर्करुग्ण आणि २६ हजार १0५ हृदयरुग्ण महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. किडनी विकार व डायलिसीसने त्रस्त २२ हजार ७९ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राज्यात विविध ठिकाणी अपघातात जखमी झालेल्या १0 हजार ६६४ महिला रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, त्यापाठोपाठ जनन व मूत्रमार्गाचे विविध आजार असलेल्या ८ हजार ६४५ महिलांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यासोबतच ४६ हजार ६१९ महिला रुग्णांवर इतर आजारांसंदर्भात आवश्यक ठरलेल्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. महिला आरोग्य अभियान पंधरवड्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून, यापुढेही महिलांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.