दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांचे उपोषण सुरू
By Admin | Updated: August 7, 2014 23:00 IST2014-08-07T20:39:53+5:302014-08-07T23:00:03+5:30
गावातील महिलांनी दारू दुकानासमोर साखळी उपोषण सुरू केले

दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांचे उपोषण सुरू
बोरगावमंजू : येथील मुख्य बाजारपेठेत सुरू असलेले देशी दारूचे दुकान येथून दुसरीकडे स्थानांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी गावातील महिलांनी ५ ऑगस्टपासून सदर दारू दुकानासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.स्थानिक रविदास चौकामध्ये मुख्य बाजारपेठेतील रस्त्यालगत देशी दारूचे दुकान आहे. या रस्त्यावरून बाजारात जाणे-येणे करणार्या महिलांना या दुकानावर दारू घेण्यासाठी येणार्या दारुड्यांचा कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हे दारूडे भर रस्त्यावर धिंगाणा घालत असल्यामुळे शाळकरी मुलींना, महिलांना, वृद्ध लोकांना तसेच या भागात राहणार्या कुटुंबीयांना त्यांचा त्रास होतो. या संदर्भात परिसरातील महिलांनी जिल्ह्यातील अधिकार्यांना निवेदने दिली. परंतु काहीच कार्यवाही न झाल्याने मुंबईत जाऊन वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन सादर केले. त्यानंतरही संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी सदर दारू दुकानावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे परिसरातील महिलांनी उपोषणास प्रारंभ केला आहे.