चिमुकल्यांसह विहिरीत पडलेली महिला बचावली
By Admin | Updated: November 29, 2014 22:30 IST2014-11-29T22:30:37+5:302014-11-29T22:30:37+5:30
चिखली तालुक्यातील घटना; बालके दगावले.

चिमुकल्यांसह विहिरीत पडलेली महिला बचावली
चिखली (बुलडाणा): तालुक्यातील सवणा शिवारातील एका विहिरीवर २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी दोन चिमुकल्यांसह पाणी पिण्यासाठी गेलेल्या महिलेची मुलगी विहिरीत पडल्याने तीला वाचविण्यासाठी महिलेने उडी घेतल्यानंतर मुलगाही पाण्यात पडला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडीस आल्याने ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढले मात्र या घटनेत दोन्ही बालके दगावल्याची भिती व्यक्त होत असून यापैकी ३ वर्षीय मुलीचे प्रेत बाहेर काढण्यात आले आहे तर दिडवर्षीय मुलाचा अद्याप शोध लागला नसून शोधकार्य सुरूच आहे.
याबाबत सविस्तर असे की, सवणा येथील सौ.सविता कैलास काकफळे वय २६ वष्रे ही विवाहिता तीन वर्षीय मुलगी अश्विनी व दिड वर्षीय मुलगा योगेश या दोन चिमुकल्यांसह पुरूषोत्तम पवार यांच्या शेतातील विहिरीवर सायंकाळच्या सुमारास पाणी पिण्यासाठी गेली होती. यावेळी तिची मुलगी अश्विनी तोल जावून विहिरीत पडली असता तीला वाचविण्यासाठी महिलेने विहिरीत उडी मारली. दरम्यान विहिरीच्या काठावर असलेला मुलगा योगेश हाही पाण्यात पडला. रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेतमालकाने विहिरीवरील पंप चालू केला तेंव्हा विहिरीत अडकून पडलेल्या सौ.सविता हिने आरडाओरड सुरू केली मात्र रात्रीच्या अंधारात महिलेचा आवाज ऐकून भेदरलेल्या शेतमालकाने गावात येवून घडलेला प्रकार सांगीतल्यानंतर गावकर्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी विहिरीत अडकलेल्या सविता हिस बाहेर काढण्यात आले तर पाण्यावर तरंगत असलेले मुलीचे प्रेतही बाहेर काढण्यात आले. दरम्यान योगेश नामक मुलाचा विहिरीत शोध घेणे सुरू असून विहिरील पाणी उपसण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या घटनेत उपरोक्त महिला बचावली, मुलीचे प्रेत गवसले तर मुलाचा शोध लागला नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी सुभाष उत्तम काकफळे यांच्या फिर्यादीवरून र्मग क्र.७/१४ कलम १७४ जा.फौ.नुसार आमस्मीक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भोई व हेकॉ भुसारी करीत आहेत.