महिला उमेदवार नसल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर
By Admin | Updated: October 9, 2014 01:25 IST2014-10-09T01:25:23+5:302014-10-09T01:25:23+5:30
मूर्तिजापूर मतदारसंघात एकाही राजकीय पक्षाकडून महिलेस उमेदवारी देण्यात आली नाही.

महिला उमेदवार नसल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर
मूर्तिजापूर : विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असले तरी, एकाही राजकीय पक्षाकडून महिलेस उमेदवारी देण्यात आली नाही; त्यामुळे मतदारसंघातील महिला वर्गात नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे.
मूर्तिजापूर मतदारसंघात यापूर्वी दोन महिला आमदार होत्या. तसेच अनेकदा नगराध्यक्षपद व पंचायत समिती सभापतीपददेखील महिलांनी सांभाळले आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं, मनसे, बसपा, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, बहुजन मुक्ती पार्टी, आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टी इत्यादी राजकीय पक्षांसह संघटनांचे १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकूण मतदारांपैकी ४५ टक्के महिला मतदारांची संख्य असूनही एकाही महिलेस उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे महिला वर्गात नाराजीचा सूर असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे.