विकृत इसमाच्या तावडीतून महिलेची सुटका

By Admin | Updated: June 29, 2016 02:06 IST2016-06-29T02:06:08+5:302016-06-29T02:06:08+5:30

दामिनी पथकाची कारवाई; इसमाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल.

The woman has been released from the clutches of a perverted man | विकृत इसमाच्या तावडीतून महिलेची सुटका

विकृत इसमाच्या तावडीतून महिलेची सुटका

अकोला: जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील सरकारी बगीचा परिसरात एका महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग करीत असलेल्या एका विकृत इसमाच्या तावडीतून दामिनी पथकाने महिलेची मंगळवारी दुपारी सुटका केली. महिलेचा प्रचंड छळ करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथकाच्या प्रमुख माधुरी यावलीकर यांनी पथकासह तत्काळ धाव घेऊन इसमास सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले.
बापू नगर येथील रहिवासी २४ वर्षीय एक महिला मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रोडने सरकारी बगीच्याकडे जात असताना बापू नगरातीलच रहिवासी असलेला ईश्‍वर शकुलवारे याने तिचा पाठलाग केला. त्यानंतर एका मंदिरानजीक सदर महिलेला मारहाण करून तिला ओढत असताना परिसरातील काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर दामिनी पथकाला या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन या महिलेची इसमाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर दोघांनाही सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी ईश्‍वर शकुलवारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The woman has been released from the clutches of a perverted man