वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा
By Admin | Updated: April 10, 2015 02:08 IST2015-04-10T02:08:01+5:302015-04-10T02:08:01+5:30
पुनोती परिसरात पडल्या बोराच्या आकाराच्या गारा

वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा
सायखेड (अकोला ) : बाश्रीटाकळी तालुक्याला बुधवार पाठोपाठ गुरुवार, ९ एप्रिल रोजीदेखील वादळी पावसाने झोडपून काढले. त्याचप्रमाणे काही गावांना गारपिटीने तडाखा दिला.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बाश्रीटाकळी तालुक्यातील अनेक गावांना वादळी पावसाने झोडपून काढले. तसेच पुनोतीसह काही गावांमध्ये चारोळीपासून ते बोरापर्यंंतच्या आकाराची गारपीट झाली. यामुळे कांदा, डाळिंब, लिंबू, कैरी व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घालत व खेड्यांमध्ये घरांवरील टीनपत्रे उडवीत लोकांच्या घरातील धान्य, कपडे व अन्य बाबींचे नुकसान केले. शेतांमधील कांदा, भाजीपाला व अन्य उन्हाळी पिकांना फटका बसला. आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैर्या वादळी पावसाने पडून त्यांचा झाडाखाली खच पडला. पुनोती परिसरात बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. सकनी, जांभरूण, हलदोली, कोथळी परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. यामुळे अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडाले. तसेच शेतांमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्याचप्रमाणे धामणदरी, लोहगड, धाबा शिवारात वादळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.