शिक्षण, बांधकाम सभापतीपदाचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे सोपविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:59+5:302021-03-26T04:18:59+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम आणि महिला व बालकल्याण सभापतींचे पद रिक्त झाल्याने, या रिक्त सभापतीपदांचा प्रभार ...

शिक्षण, बांधकाम सभापतीपदाचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे सोपविणार?
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम आणि महिला व बालकल्याण सभापतींचे पद रिक्त झाल्याने, या रिक्त सभापतीपदांचा प्रभार पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देण्यात आला. मात्र, कामकाजाचा व्याप जास्त असल्याने, शिक्षण व बांधकाम सभापतीपदांचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे देण्यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) पत्र दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम सभापतीपदांचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामध्ये सदस्यत्व रद्द झाल्याने चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याकडील शिक्षण व बांधकाम सभापतीपद आणि मनीषा बोर्डे यांच्याकडील महिला व बालकल्याण सभापतीपद रिक्त झाले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी ९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार रिक्त झालेल्या दोन्ही सभापतीपदांचा प्रभार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्याकडे सोपविण्यात आला होता; परंतु कामकाजाचा व्याप जास्त असल्याने जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापतीपदांचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्याकडे सोपविण्यात यावा, असे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी २५ मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शिक्षण व बांधकाम सभापतीपदाचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्याकडे सोपविण्यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून २६ मार्च रोजी आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी अध्यक्षांकडे देण्यात आलेला शिक्षण व बांधकाम सभापतीपदांचा प्रभार आता जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे सोपविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.