‘मराठा कार्ड’ची खेळी यशस्वी ठरणार का?
By Admin | Updated: December 23, 2015 02:42 IST2015-12-23T02:42:14+5:302015-12-23T02:42:14+5:30
विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी; युतीसाठी प्रतिष्ठेची लढाई.

‘मराठा कार्ड’ची खेळी यशस्वी ठरणार का?
आशिष गावंडे/अकोला: विधान परिषद निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रवींद्र सपकाळ दंड थोपटून उभे आहेत. विद्यमान आमदारांना आव्हान देण्यासाठी आघाडीच्यावतीने ह्यमराठा कार्डह्ण समोर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शिवसेना व भाजपमधील मराठा-बहुजन लोकप्रतिनिधींचा वरचष्मा लक्षात घेता, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा कार्डची खेळी कितपत यशस्वी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. शिवसेनेच्यावतीने विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया तिसर्यांदा निवडणूक लढवत असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा उमेदवार म्हणून रवींद्र सपकाळ यांना मैदानात उतरविले. बाजोरिया मागील बारा वर्षांपासून अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील स्वायत्त संस्थांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून कोसोदूर नेऊन ठेवले. हा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चटका देणारा ठरला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील मराठा मतदारांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसने विचारपूर्वक मराठा समाजाचा उमेदवाराला मैदानात उतरविले आणि प्रचारादरम्यानही मराठा कार्डचाच वापर केला जात आहे.
विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात येणार्या तिन्ही जिल्ह्यात शिवसेना-भाजप पक्षांचे खासदार संजय धोत्रे, राज्याचे नगरविकास मंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, बुलडाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव तसेच वाशिम जिल्ह्यातील खासदार भावना गवळी या मराठा समाजातील आहेत. त्यामुळेच विधान परिषदेची ही निवडणूक युतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.