ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीव धोक्यात
By Admin | Updated: January 11, 2015 00:32 IST2015-01-11T00:22:36+5:302015-01-11T00:32:23+5:30
बुलडाणा-खामगाव मार्ग बंद करण्याची मागणी : मोताळा, पिंपळगावराजा असा होऊ शकतो पर्यायी मार्ग.

ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीव धोक्यात
सिद्धार्थ आराख /बुलडाणा
चार तालुक्यातील २0 हजार ३५६.६0 हेक्टर असा विस्तीर्ण परिसर व्यापलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीवाला धोका निर्माण झाला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातून बुलडाणा -खामगाव हा राज्य मार्ग क्र. २४ जात असून या मार्गावर वाढलेल्या वाहतुकीमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाबरोबरच रात्रीच्या वेळी भरधाव वाहनाची धडक लागून वन्यप्राण्यांना जिवाला मुकावे लागत आहे. या मार्गावर वर्षभरात वाहनांच्या अपघातात दोन मादी बिबटला आपले प्राण गमवावे लागले. शेकडो प्राणीही वाहनाचे बळी ठरत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात अंबाबरवा, लोणार आणि ज्ञानगंगा अशी तीन अभयारण्ये आहेत. यापैकी ज्ञानगंगा अभयारण्याची व्याप्ती सार्वाधिक आहे. चिखली, खामगाव, बुलडाणा आणि मोताळा असे तीन तालुक्यात हे अभयारण्य व्यापलेले असून २१ बिट, ९६ कक्ष, ७ वर्तुळ आणि २१ नियत क्षेत्र या अभयारण्यात आहे. मौल्यवान वनसंपदेबरोबरच बिबट, अस्वल, कोल्हा, लांडगे, निलगाय, काळवीट, हरिण, रानमांजर यासह अन्य प्राणी या जंगलात वास्तव्यास आहेत.
जवळपास १५ ते २0 किमी मार्ग हा अभयारण्यातून जातो. अलीकडे या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर छोट्या वाहनांबरोबरच जड वाहतूक वाढली आहे. वाहनाच्या कर्कश आवाजामुळे प्राण्यांची शांतता भंग होते. वायुप्रदुषणामुळे प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. शिवाय रात्रीच्या वेळी भटकंती करत हे प्राणी जंगलाच्या बाहेर पडून रस्त्यावर येतात.
या रस्त्यावरून जाणार्या भरधाव वाहनाची धडक लागल्याने त्यांचा हकनाक बळी जातो. मागील जानेवारी २0१४ रोजी याच मार्गावर मादी बिबटला वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गतप्राण झाले होते. यावर्षी ९ जानेवारी रोली पुन्हा एक बिबट ठार झाले. विशेष म्हणजे वाहनाच्या अपघाताचे बळी ठरलेले हे दोन्ही मादी बिबट गर्भवती होते. याशिवाय वर्षभरात रानमांजर, हरिण, काळवीट, कोल्हे, लांडगे, अस्वल यासह दुर्मीळ शेकडो प्राणी रस्त्यावर येऊन अपघाताचे बळी ठरत आहेत; मात्र शासनाचा वन्यजीव विभाग याकडे डोळेझाक करीत आहे.