वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:41+5:302021-07-07T04:23:41+5:30
उन्हाचा पारा वाढला ; शेतीकामे प्रभावित बोरगाव मंजू : जिल्ह्याचा उन्हाचा पारा चांगलाच वर चढला आहे. रविवारी तापमान ३६. ...

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
उन्हाचा पारा वाढला ; शेतीकामे प्रभावित
बोरगाव मंजू : जिल्ह्याचा उन्हाचा पारा चांगलाच वर चढला आहे. रविवारी तापमान ३६. २ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानाने शेतशिवारातील कामे मंदावली आहेत. भाजीपाला पिकासह इतर पिकांना सुद्धा उन्हाचा मोठा फटका बसत आहे.
-------------------------
एसटी वाहतूक थंड ; प्रवासी त्रस्त
पातूर : अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे येणारा नागरिकांचा लोंढा कमी झाला. शहरी भागात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने असल्याने एसटीतून प्रवास करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
--------------------------
बार्शीटाकळी परिसरात सुविधांचा अभाव
बार्शीटाकळी : शहरालगत बाहेरगावाहून आलेल्या मजुरांच्या अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक वर्षांपासून येथे आवश्यक प्रमाणात सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाहीत.
---------------------
रानडुकरांचा धूडगुस, शेतकरी त्रस्त
चोहोट्टा बाजार : शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केली असून, रानडुकरे शेतातील पिकांवर ताव मारून पिके नष्ट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. रानडुकरे तूर, सोयाबीन पीक खात असल्याने, शेतकरी संकटात सापडले आहे. पिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना शेतात जाऊन रात्रभर जागरण करावे लागत आहे.
विना विमा वाहनांवर कारवाईच नाही
पातूर: कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत.
--------------------------
सुरक्षा कवच विना डीपी धोकादायक
बाळापूर : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीचे डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, विद्युत कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
महागाईमुळे नागरिक त्रस्त
दहिहांडा : जिल्ह्यातील दहिहांडा गाव शेवटच्या टोकाचे गाव आहे. कोरोना महामारीमुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापार ठप्प झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले आहेत. लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाकडून नागरिकांची लूट करण्यात येत आहे. दामदुपटीने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यात येत आहे. मजूर वर्गावर तर उपासमारीची वेळ आली आहे.
नियमांचे उल्लंघन ; पोलिसांची दंडात्मक कारवाई
निहिदा : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने निर्बंध लावले आहेत. ; मात्र तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. पिंजर पोलिसांनी रविवारी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला. तसेच अनेक वाहनांची तपासणी केली.
हातरूण-गांधीग्राम रस्त्याची दुरवस्था
हातरूण : हातरुण-गांधीग्राम रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी हातरुण परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे.
बाजारपेठेत गर्दी कायम ; संसर्गाचा धोका वाढला !
निहिदा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. मात्र बार्शीटाकळी तालुक्यात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बाजारपेठेत गर्दी, बसस्थानकात गर्दी, बाजारपेठेत गर्दी दिसून येत असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत
नया अंदुरा : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराची प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता ; मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.
सस्तीनजीक पुलाची दुरवस्था
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी-वाडेगाव मार्गावरील सस्ती जवळील वघाडी नाल्यावरील पुलाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होत असून, अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
स्वच्छतागृहांची निर्मिती करावी !
वाडेगाव : परिसरातील गावांमध्ये बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. विशेषकरून याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. बसस्थानक परिसरात सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
------------------------------------
भाजीपाला विक्रीसाठी पर्यायी जागा द्या !
अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. एकाच ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी पर्यायी व स्वच्छ जागा देण्याची मागणी भाजीपाला विक्रेत्यांकडून होत आहे.
--------------------------------------
ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेती वाहतूक, जनावरांची अवैध वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री, अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. सद्यस्थितीत दारूची दुप्पट दराने विक्री होत असल्याचे चित्र आहे.
---------------------------------------
क्रीडा संकुलाची दुरवस्था
तेल्हारा : येथील क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. क्रीडा संकुलामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाची स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.