अपघातप्रवण स्थळ दर्शविणारे फलक गेले कोठे?
By Admin | Updated: May 12, 2014 22:33 IST2014-05-12T20:56:39+5:302014-05-12T22:33:03+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र .६ वर अपघातांच्या संख्येत वाढ

अपघातप्रवण स्थळ दर्शविणारे फलक गेले कोठे?
बाभुळगाव जहागीर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अकोला ते मूर्तिजापूरदरम्यान अनेक अपघातप्रवण स्थळे असून, या ठिकाणी बरेच अपघात घडून अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. ही अपघातप्रवण स्थळे दर्शविण्यासाठी फलकही लावण्यात आले होते; परंतु गत काही महिन्यांपासून असे अनेक फलक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून दिसेनासे झाले आहेत, तर काही फलकच अपघातग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
सुरत-कोलकाता या १९४९ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर हे तीन जिल्हे येतात. अक ोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, बोरगाव मंजू, कुरणखेड, मूर्तिजापूर ही महत्त्वाची शहरे या मार्गावर आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर गत काही महिन्यांत अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर ते अकोलादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना आपले अवयवही गमवावे लागले आहेत. या रस्त्यावर अनेक अपघातप्रवण स्थळ आहेत. त्याची माहिती दर्शविणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले होते; परंतु त्यातील बरेचशे फलकच अपघातग्रस्त झाले, तर अनेक फलक दिसेनासे झाले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी कठडे नसलेले पूल असून, वाहनचालकांना त्याची सूचना देणारे फलकही लावण्यात आलेले नाहीत. काही वळणरस्त्यावरही फ लक नाहीत. त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, संबंधित विभागाकडून त्याची थोडीही दखल घेण्यात आल्याचे दिसत नाही. अकोला शहरालगत असलेल्या बाभुळगाव जहागीरनजीकच्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या धोक्याच्या वळणावर त्याची सूचना देणारा फलक नाही. मूर्तिजापूर शहराच्या जवळ असलेल्या वणीरंभापूर येथील कुष्टधामनजीक धोक्याच्या वळणावरील फलकही गायब झाला आहे. महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनी याची गंभीर दखल घेऊन नादुरुस्त असलेल्या फलकांची दुरुस्ती करावी आणि आवश्यक ठिकाणी फलक लावून अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी वाहनधारक आणि जनतेकडून करण्यात येत आहे.