वसंत देसाई क्रीडांगणमधील जलतरण तलाव केव्हा सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:44 IST2019-02-08T15:44:26+5:302019-02-08T15:44:52+5:30
अकोला: दुरुस्तीच्या नावाखाली तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असलेला संगीतकार वसंत देसाई क्रीडांगणमधील तरण तलाव कधी सुरू होणार आहे, असा सवाल जलतरणपटू व हौशी जलतरणपटू विचारत आहेत.

वसंत देसाई क्रीडांगणमधील जलतरण तलाव केव्हा सुरू होणार?
अकोला: दुरुस्तीच्या नावाखाली तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असलेला संगीतकार वसंत देसाई क्रीडांगणमधील तरण तलाव कधी सुरू होणार आहे, असा सवाल जलतरणपटू व हौशी जलतरणपटू विचारत आहेत. याबाबत मंगळवारी नियमित जलतरणाकरिता येणाऱ्या नागरिकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांना सवाल केला.
जलतरणाकरिता महत्त्वाचा सीजन असलेला मार्च जवळ आला आहे; मात्र शहरात एकमेव असलेला तरणतलाव अद्याप दुरुस्त केला नाही. जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या गेल्या नाहीत. वर्षाकाठी दहा लाख रुपयांचा महसूल तरण तलावाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल समितीला मिळतो; मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकुल समिती याबाबत उदासीन आहे. यामुळे जलतरणपटूंमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जलतरणपटूंनी अनेक वेळा यासंदर्भात पाठपुरावा केला; मात्र थातूरमातूर कारण सांगून जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव वेळ मारू न नेतात. जिल्हाधिकारी हे जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आहेत; परंतु प्रसिद्धीचा हव्यास असलेल्या जिल्हाधिकारी यांना क्रीडा क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष द्यावेसे वाटले नाही. त्यामुळे सहा महिने उलटून गेले तरीदेखील तरण तलाव दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तरण तलाव भोवती उंच भिंत उभारणार असल्याचे क्रीडा प्रशासनाने सांगितले होते; परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचे बांधकाम येथे सुरू झालेले नाही. तलावामधील टाइल्स दुरुस्तीच्या नावाखाली तलाव बंद करण्यात आला होता; मात्र तीन महिने उलटूनही टाइल्स दुरुस्त झाल्या नाहीत. तरण तलाव चालविण्याकरिता कंत्राट दिल्या जातो. अद्याप नवीन कंत्राटदार नेमण्यात आलेला नाही. या सर्व समस्यांबाबत जाब विचारायला क्रीडाप्रेमी नागरिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे मंगळवारी गेले होते. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महिना-दीड महिना कर्तव्यावर होतो. त्यानंतर आर्किटेक्ट सुटीवर गेल्यामुळे आणि आता जिल्हाधिकारी सुटीवर असल्यामुळे काम झाले नाही; मात्र मार्चच्या सुरुवातीला तरण तलाव सुरू होईल, अशी ग्वाही आसाराम जाधव यांनी दिली.